महाराष्ट्रात मोदींचा चेहरा चालणार नाही; शरद पवार यांचा जोरदार हल्ला

आंध्र प्रदेश आणि बिहारच्या जिवावर सत्तेवर आलेल्या मोदी सरकारची धोरणे बदलायची असतील तर सरकार बदला, अन्याय आणि जुलूम करणारे सरकार खाली खेचा.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची अवस्था फारच वाईट आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नाच्या दुपटीने त्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत आणि या परिस्थितीला केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार जबाबदार आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केला. महाराष्ट्रात मोदींचा चेहरा चालणार नाही, असेही पवारांनी ठणकावले.

सोलापूरच्या बार्शी येथे शरद शेतकरी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्याला शरद पवार यांनी मार्गदर्शन केले. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला मिळत नाही. त्यामुळे शेतकरी बांधव आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत, अशी टीका शरद पवार यांनी यावेळी केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखायच्या असतील तर त्यांच्या मालाला योग्य भाव दिला पाहिजे, असा पर्यायही त्यांनी सुचवला.

लोकसभेप्रमाणे विधानसभेतही मराठवाडय़ातील जनता महाविकास आघाडीच्या सोबत राहील, असा विश्वास यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केला. भरदुपारीही मेळाव्यासाठी मोठय़ा संख्येने शेतकरी उपस्थित होते. ते पाहून आपण परिवर्तनाच्या दिशेने उभे आहोत याचे हे संकेत आहेत, असे शरद पवार म्हणाले.

यावेळी माढय़ाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील आणि धाराशीवचे शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांचा शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

माजी मंत्री, आमदारांच्या भेटीगाठी

शरद पवार यांनी या मेळाव्याच्या निमित्ताने बार्शीच्या माजी आमदार प्रभावती झाडबुके यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. 90 वर्षीय झाडबुके यांनी यावेळी पवार यांना राखी बांधली आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला. माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या निवासस्थानीही शरद पवार यांनी भेट दिली.

महाविकास आघाडीने शेतमालाला दर दिले

महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामांचा उल्लेख शरद पवार यांनी यावेळी केला. शेतकऱ्यांची 80 हजार कोटींची कर्जे माफ करून त्यांच्या डोक्यावरचे ओझे आमच्या सरकारने कमी केले. शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाचा विचार करून त्यांच्या शेतमालाला दर दिले. उत्पादन जास्त झाले तेव्हा तो शेतमाल जगाच्या बाजारपेठेत पाठवण्याचा विचार केला. फळबागांसंदर्भातील योजनांचा शेतकऱ्यांना फायदा झाला, असे शरद पवार म्हणाले. देशातील अनेक राज्यांमध्ये भाजपाचे सरकार आहे पण शेतकऱ्यांचा विचार केला जात नाही, असा आरोपही त्यांनी केला.

आरक्षण दिले नाही, मग गुलाल का उधळला?

मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावरही शरद पवार यांनी यावेळी भाष्य केले. मराठा आरक्षण दिल्याची घोषणा करत सरकारने गुलाल उधळला होता. त्यानंतरही मराठा आरक्षणाचा प्रश्न अजून का कायम आहे? गुलाल कोणत्या आधारावर उधळला, असे सरकारला विचारले पाहिजे, असे शरद पवार म्हणाले. 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण देणार आहे असे सांगितले होते, याचीही आठवण शरद पवार यांनी करून दिली.

महायुती सरकारला पराभूत करणे हेच ध्येय

लोकसभेला 400 पार म्हणणाऱ्या भारतीय जनता पक्षाला 300 पारही जाता आले नाही, असे नमूद करत शरद पवार यांनी विधानसभा जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला. महाविकास आघाडीमध्ये लहान भाऊ, मोठा भाऊ असे काहीच नाही. आगामी विधानसभा निवडणुकीतही राज्यातील महायुती सरकार पराभूत करणे हेच महाविकास आघाडीचे ध्येय असल्याचे शरद पवार यावेळी निक्षून सांगितले.