कृषीपुरस्कार सोहळ्यात गोंधळ, शेतकऱ्यांचा फेटे फेकून निषेध

राज्य सरकारच्या कृषी विभागातर्फे आज देण्यात येणाऱ्या कृषी पुरस्कार सोहळ्यादरम्यान मुंबईत गोंधळ उडाल्याचे समोर आले आहे. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्तेच सर्व विजेत्यांना पुरस्कार देण्याच्या मागणीसाठी विजेत्या शेतकऱ्यांनी गोंधळ घातला. शेतकऱ्यांनी फेटे उडवून निषेध नोंदवला. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.

कृषी विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सन 2020, 2021 व 2022 या तीन वर्षांचे सत्कार व पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन वरळी येथील एन. एस. सी. आय डोम येथे करण्यात आले. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहणार असे जाहीर करण्यात आले होते, पण फक्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री धनंजय मुंडे आदीच उपस्थित राहिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सोहळ्याला उपस्थित राहिले नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांनी याबद्दलही नाराजी व्यक्त केली.

या गोंधळावरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही महायुती सरकारवर निशाणा साधत शेतकऱ्यांना अशा प्रकारे अपमानित करणे चुकीचे असल्याची टीका वडेट्टीवार यांनी ‘एक्स’वरील पोस्टवरून केली.

राज्यपालांच्या नियोजित दौऱ्यामुळे त्यांनी आधी एक तास आणि कार्यक्रमावेळी फक्त अर्धा तास दिला. तर या कार्यक्रमात फक्त राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. यावरून शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी उसळली. शेतकऱ्यांनी भर कार्यक्रमात फेटे उडवून निषेध केला. यावेळी धनंजय मुंडे यांनी राज्यपालांना नागपूरला जायचे असल्याने कार्यक्रमाची वेळ वाढविली नाही, मात्र सर्व शेतकऱ्यांना राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार देऊ असे सांगत शेतकऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.