परिषदेतील पाच आमदारांना निरोप

विधिमंडळातील वरिष्ठ सभागृह असलेल्या विधान परिषदेतून 21 जून रोजी निवृत्त झालेल्या सुरेश धस, प्रवीण पोटे पाटील, रामदास आंबटकर, नरेंद्र दराडे, विप्लव बाजोरिया या पाच आमदारांना आज विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या समारंभात निरोप देण्यात आला.

विधिमंडळातील वरिष्ठ सभागृह असलेल्या विधान परिषदेत वि. स. पागे, जयंतराव टिळक, रा. सु. गवई अशा अनेक ज्येष्ठ सदस्यांच्या विचारांची परंपरा लाभलेली असून या सभागृहाच्या माध्यमातून संसदीय आयुधांचा वापर करून सदस्यांनी जनतेचे प्रश्न सोडवले असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी निवृत्त सदस्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, उपसभापती डॉ. नीलम गोऱहे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उपस्थित होते.