प्रसिद्ध लोकगायिका शारदा सिन्हा यांचे निधन

‘बिहारची कोकिळा’ अशी ख्याती असलेल्या प्रसिद्ध लोकगायिका शारदा सिन्हा (72) यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. प्रकृतिअस्वास्थ्यामुळे सोमवारपासून त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात व्हेंटिलेटरवर उपचार सुरू होते. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

शारदा सिन्हा यांनी छठवर गायलेली गाणी खूप प्रसिद्ध आहेत. भोजपुरी, मैथिली, मगही यासह अनेक भाषांमध्ये त्यांनी लोकगीते गायली. शारदा देवी यांनी ‘मैंने प्यार किया’ चित्रपटामधील ‘काहे तोसे सजना’ आणि ‘गँग्स ऑफ वासेपूर’मधील  ‘तार बिजली से पतले’ या गाण्यांना आवाज दिला. 1991 मध्ये ‘पद्मश्री’ आणि 2018 मध्ये ‘पद्मभूषण’ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.