माजी मंत्री मधुकर पिचड यांचे निधन

माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. नाशिक येथील रुग्णालयात गेल्या दीड महिन्यापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. राज्य सरकारमध्ये त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणूनही अनेक वर्षे काम केले. मधुकर पिचड यांनी 1980 ते 2009 पर्यंत अहिल्यानगर जिह्यातील अकोले विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. तर मार्च 1995 ते जुलै 1999 या काळात ते विधानसभेत विरोधी पक्षनेते होते.

सुरुवातीच्या काळात शरद पवार यांचे खंदे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून त्यांची राजकीय ओळख होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. 2019 मध्ये त्यांनी त्यांचा मुलगा वैभव पिचड यांच्यासह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मधुकर पिचड यांनी सहकार क्षेत्रातही आपला ठसा उमटवला. अमृतसागर दूध सहकारी संस्था अकोलेची त्यांनी स्थापना केली. तसेच अगस्ती सहकारी साखर कारखान्याची स्थापना करून संस्थापक-अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले.

मधुकर पिचड यांचा जन्म 1 जून 1941 रोजी झाला. त्यांचे वडील काशिनाथ पिचड हे एक शिक्षक होते. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून त्यांनी बीएएलएलबी करून वकिलीचे शिक्षण पूर्ण केले. विद्यार्थी असतानाच त्यांनी राजकारणात प्रवेश केला. सुरुवातीला सत्तरच्या दशकात जिल्हा परिषद सदस्य म्हणून आणि नंतर पंचायत समिती अकोले तालुका अध्यक्ष म्हणून निवडून आल्यापासून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषविली. आदिवासी विकास, वन व पर्यावरणमंत्री म्हणूनही त्यांनी कार्यभार पाहिला होता.

आदिवासी समाजाची हानी – शरद पवार

‘मधुकर पिचड हे महाराष्ट्रातील आदिवासी समाजाचे ज्येष्ठ नेते होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी अतिशय चांगली सांभाळली होती. तसेच विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याची जबाबदारीदेखील त्यांनी सांभाळली होती. मधुकर पिचड यांचं जाणं हे शेतकऱ्यांना आणि अदिवासी समाजाला धक्का बसणारं आहे.

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे व्यक्तिमत्त्व हरपले – बाळासाहेब थोरात, काँग्रेस नेते

अकोलेसारख्या आदिवासी व दुर्गम भागातून जीवनाचा प्रवास सुरू करणारे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांनी राज्यात विविध खात्यांचे मंत्रिपद भूषवताना अत्यंत कार्यक्षमपणे काम केले. राज्यभरातील आदिवासींच्या विकासासाठी मोठे काम करताना अकोले तालुक्याचा सर्वांगीण विकास त्यांनी केला. निळवंडे धरणाच्या निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान आहे.