ईव्हीएम हॅक करता येतं असा दावा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केला आहे. ईव्हीएममुळे देशातली लोकशाही धोक्यात आली आहे आणि यासाठी विद्यमान केंद्र सरकार आणि राज्य सरकार जबाबदार आहेत असेही जानकर म्हणाले.
नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना जानकर म्हणाले की, ईव्हीएम हॅक करता येतं मी इंजिनीअर आहे म्हणून मला माहित आहे. लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर मतपत्रिकेवर निवडणूक घ्यावी आम्ही स्वागत करू. साताऱ्यात एकाच उमेदवाराला समान मतं कशी काय पडू शकतात. लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर ईव्हीएम बॅन करा. सर्वोच्च न्यायालय त्यांचं आहे. लोकशाहीचे चार स्तंभही त्यांचे आहेत. अगदी माध्यमंही त्यांच्या हातात आहेत. लोकशाहीच्या चारही स्तंभावर जर त्यांचे अधिराज्य आहे तर ही लोकशाही नाही असेही जानकर म्हणाले.
तसेच एक दोन आमदार असलेल्या पक्षांची अवस्था कशी असते हे सगळ्यांना माहित आहे. शेळीच्या शेपटी सारखी ना माशी हाकता येत ना अब्रू झाकता येत. आमचा एकमेव आमदार निवडून आला आहे, तो आमदार सध्या तरी आमच्या सोबत आहेत. ईव्हीएममुळे या देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. त्यासाठी विद्यमान राज्य आणि केंद्र सरकार जबाबदार आहे असेही जानकर म्हणाले.