T20 World Cup 2024 रोहितच्या सेनेवर कौतुकाचा वर्षाव

तब्बल 17 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपच्या जगज्जेतेपदावर मोहर उमटविणाऱया टीम इंडियावर देशभरातील माजी दिग्गज क्रिकेटपटूंनी कौतुकाचा वर्षाव केला. याचबरोबर आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्त झालेले कर्णधार रोहित शर्मा, रन मशीन विराट कोहली व अष्टपैलू रवींद्र जाडेजा यांना कसोटी व एकदिवसीय क्रिकेटसाठी शुभेच्छाही दिल्या.

पूर्वी मी म्हणायचो की, हिंदुस्थानी क्रिकेटपटू नव्वदीच्या फेऱयात अडकतात. सातत्याने उपांत्य आणि अंतिम फेरीत पराभूत होऊन देशवासीयांना निराश करतात. मात्र, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने यंदा सर्वच आघाडय़ांवर सरस खेळ करीत टी-20 वर्ल्ड कपचे जगज्जेतेपद पटकाविले आहे.
– सुनील गावसकर, माजी क्रिकेटपटू

देशाला क्रिकेट वर्ल्ड कपमधील चौथा स्टार (1983, 2007, 2011च्या वर्ल्ड कपनंतर) मिळाला आहे. टीम इंडियाच्या जर्सीवरील प्रत्येक स्टार देशातील युवा क्रिकेटपटूंना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी नक्कीच प्रेरणा देईल. वेस्ट इंडिजमध्ये राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली क्रिकेटचे जीवनचक्र पूर्ण झाले. राहुल द्रविडसाठी मी खूप आनंदी आहे.
-सचिन तेंडुलकर, माजी क्रिकेटपटू

प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास काही काळासाठी माझ्या हृदयाचे ठोके वाढले होते. मात्र, हिंदुस्थानी खेळाडूंनी केलेल्या कष्टाचे अखेर चिज झालं. देशातील आणि जगभरातील सर्व हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींच्या वतीने जगज्जेतेपदाची ट्रॉफी जिंकल्याबद्दल टीम इंडियाचे मनःपूर्वक अभिनंदन. मला वाढदिवसासाठी अद्भूत भेट दिल्याबद्दल धन्यवाद.
– महेंद्रसिंह धोनी, माजी कर्णधार

टी-20 वर्ल्डकप विजेत्या हिंदुस्थानी संघाचे अभिनंदन. स्पर्धेतील सर्वेत्तम आणि अपराजित संघ. पाच षटके शिल्लक असताना हातातून निसटलेला सामना खेचून आणला. सर्व खेळाडू कौतुकास पात्र आहेत.
– व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, माजी क्रिकेटपटू

अखेर तुम्ही करून दाखविले. हार्दिक पांडय़ा तू हिरो आहेस. जसप्रीत बुमराह तू एका षटकात सामना हिंदुस्थानकडे फिरवलास. रोहित शर्मा तुझ्यासाठी खूप खूश आहे. दबावातही शानदार नेतृत्व. कोहली, द्रविड आणि पूर्ण संघाचे विजेतेपदासाठी अभिनंदन. सूर्यकुमारचा अफलातून झेल तर संस्मरणीयच.
– युवराज सिंह, माजी क्रिकेटपटू

रोहित शर्मा आणि टीम इंडियाचे अभिनंदन. अतिशय शानदार विजय. बुमराहची शानदार कामगिरी. विराट, अक्षर, हार्दिक सर्वांनीच जबरदस्त कामगिरी केली. राहुल द्रविड आणि सहयोगी स्टाफचे अभिनंदन.
– सौरव गांगुली, माजी कर्णधार

हा माझा हिंदुस्थान. आम्ही विजेते आहोत. हिंदुस्थानी संघाचा अभिमान. विश्वविजयी कामगिरीसाठी संघातील प्रत्येक खेळाडूचे अभिनंदन.
– हरभजन सिंह, माजी क्रिकेटपटू

रोहित शर्मा, विराट कोहली यांच्या निवृत्तीनंतर त्यांची उणीव भरून काढण्यासाठी दोन ते तीन वर्षे लागतील. आयपीएलमधून अनेक क्रिकेटपटू येत आहेत; पण संघ स्थिरावण्यास काही काळ लागेल. 1983मध्ये आम्ही छुपे रुस्तुम होतो; पण त्यानंतर विश्वचषकात नेहमीच आमच्याकडून विजयाची अपेक्षा केली जाऊ लागली.
– रॉजर बिन्नी, अध्यक्ष, बीसीसीआय

आम्ही जगज्जेते ठरलो. हिंदुस्थान संघातील प्रत्येक खेळाडूचा विश्वविजयी कामगिरीत मोलाचा वाटा. अभिनंदन टीम इंडिया. विराट कोहलीचा अखेरचा सामना होता. त्याची कारकीर्द शानदार राहिली. टी-20 विश्वचषकातील त्याच्या काही खेळी कायम लक्षात राहतील.
– रविचंद्रन अश्विन, फिरकीपटू

विराट आणि रोहित यांनी विश्वचषक जिंकून आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. कोणत्याही चित्रपटाच्या पटकथेपेक्षा ही पटकथा चांगली होती. दोन्ही खेळाडू अप्रतिम आहेत. त्यांनी हिंदुस्थानी क्रिकेटसाठी खूप काही केले आहे. मी त्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो.
– गौतम गंभीर, माजी क्रिकेटपटू