मोदींपासून फडणवीसांपर्यंत सगळे एकजात खोटारडे! संजय राऊत यांचा घणाघात

बारामती येथे पार पडलेला ‘नमो महारोजगार मेळाव्या’ची स्तुती करण्याचा प्रश्न नाही. सरकार राज्याचे आहे, कोणा एका पक्षाचे नाही. मोदी यांनी वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. देशात बेरोजगारीचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे रोजगार देणे ही केंद्र आणि सरकारची जबाबदारी आहे. फडणवीस बेछूट आणि बेफामपणे काहीही बोलतात. त्यांना महत्त्व देण्याची गरज नाही. मोदींपासून फडणवीसांपर्यंत सगळे एकजात खोटारडे आहेत,’ असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते-खासदार संजय राऊत यांनी केला.

खासदार संजय राऊत यांनी आज शिर्डीत साईदरबारी हजेरी लावत साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ‘ज्या बारामतीत शरद पवार यांनी अनेक उद्योग आणून रोजगार दिला, तेथे मेळावा होत आहे. तेथे तुम्ही राजकारणासाठी मेळावा घेत असाल, तर तो शरद पवारांचा इलाका आहे, ते धमाका करणारच,’ असे संजय राऊत म्हणाले.

‘महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा संपली आहे. यावर आता कोणतीही बैठक होणार नाही. ‘वंचित’ने जागांचा प्रस्ताव दिलाय. त्यावर प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर चर्चा करून निर्णय घेऊ. त्यांना महाविकास आघाडीत समाविष्ट केले असून, लवकरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांसोबत आंबेडकर यांची बैठक होणार आहे,’ असेही संजय राऊत यांनी सांगितले. ‘राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याययात्रा’ मुंबईत येत आहे. राहुल गांधी हे ‘इंडिया’ आघाडीचे नेते आहेत. त्यांनी सुरू केलेल्या यात्रेचा विषय महत्त्वाचा आहे. त्यांच्या यात्रेचे आम्ही सगळे स्वागत करणार आहोत,’ असेही ते म्हणाले.

‘शिर्डीची जागा शिवसेना लढविणार असून, ही जागा शिवसेना सातत्याने जिंकत आली आहे. आम्ही येथे प्रचारालादेखील सुरुवात केली आहे. चर्चेत प्रत्येक पक्ष जागा मागत असतो. त्यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह असतो. मात्र, पुढे जायचे असते,’ असे ते म्हणाले.

सुदैव आहे इथल्या पालकमंत्र्यांवर ती वेळ आली नाही!
भाजपचे विवेक कोल्हे यांनी पालकमंत्री विखे-पाटील यांच्याविरोधात मोर्चा काढला. यावेळी कोपरगाव तालुक्याला निधी देताना पालकमंत्री दुजाभाव करतात, असा आरोप कोल्हे यांनी केला होता. याबाबत विचारले असता, ‘काल निधीवाटपावरून एका मंत्र्याने मार खाल्ला आहे. सुदैव आहे इथल्या पालकमंत्र्यांवर ती वेळ आली नाही,’ असा टोला संजय राऊत यांनी लगावला.