सध्याच्या सोशलमीडिया आणि डिजिटल युगात पारंपरिक प्रचाराचा बाज आजही कायम असल्याचे चित्र आहे. भाषण, लाऊडस्पीकर, पत्रके, ध्वज, मफलर, टोपी प्रचारात प्रभावी ठरत आहे. यामुळे डिजिटल युगातही पारंपरिक प्रचाराच्या ध्यमातून प्रचार कायम असल्याचे चित्र आहे.
विधानसभा निवडणूक प्रचारात सध्या डिजिटल यंत्रणेवरच भर असला, तरी पारंपरिक प्रचारही तेवढाच प्रभावी ठरत आहे. त्यामुळे पारंपरिक प्रचाराच्या माध्यमांवर भर देण्यास उमेदवारांकडून प्राधान्य दिले जात आहे. पूर्वी पेंटरकडून भिंती रंगवून, प्रचार बॅनर तयार केले जात. रिक्षा व इतर वाहनांच्या माध्यमातून ध्वानिक्षेपकाद्वारे मतदानाचे आवाहन करावे लागते. प्रचारपत्रके वाटावीच लागतात. ध्वज, मफलर, टोपी यांचीही क्रेझ कायम आहे. डिजिटलचे गुणगाण कितीही गायले तरी या पारंपरिक प्रचाराचा बाज कायम असल्याचे या निवडणुकीत सिद्ध झाले आहे.
कोणतीही निवडणूक म्हटली की प्रचार आलाच. परंतु, पूर्वीची निवडणूक आणि आताची निवडणूक यात चांगलाच फरक दिसून येतो. पूर्वी साधनांची कमतरता होती. मात्र, आता साधनांची मुबलकता आहे. बदलत्या काळानुसार प्रचार आणि चाराची साधने बदलली. सध्याचा काळ हा सोशल मीडियाचा आहे. व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आदी माध्यमांतून प्रत्येकजण व्यक्त होऊ शकतो. राजकारणातही या माध्यमांचा वापर मोठ्या खुबीने सध्या केला जात आहे. विशेषतः लोकसभा निवडणूक ते ग्रामपंचायत निवडणुकांमधील प्रचारात या माध्यमांना महत्त्वाचे स्थान आहे. उमेदवारांच्या भूमिका, पाठिंबा, प्रचाराचे नियोजन, प्रचाराचे व्हिडीओ, चिन्हांचा प्रसार आदींसाठी सोशल मीडिया प्रभावी माध्यम बनले आहे. या माध्यमांद्वारे बहुतांशी तरुणवर्गापर्यंत पोहोचण्याची संधी उमेदवारांना मिळत असल्याने या सोशल, डिजिटल प्रचारासाठी स्वतंत्र टीम कार्यरत आहेत. प्रत्येक उमेदवाराने त्यासाठी ‘अॅक्टिव्ह’ तरुणांची, तर काहींनी संस्थांची नेमणूक केली आहे.
उमेदवार, चिन्हांचे फोटो, प्रचार फेऱ्या, सभेचे फोटो, व्हिडीओ आणि उमेदवारांचा चेहरा अधिकाधिक गतीने लोकांपर्यंत पोहोचवण्याचे माध्यम म्हणून या डिजिटल मीडियात विशेष पसंती मिळत आहे. या माध्यमांमुळे पारंपरिक प्रचाराचा बाज कमी होत चालल्याची चर्चा असली, तरी आजही त्याचे अस्तित्व पाहायला मिळत आहे.