जॉर्जियाचा पोर्तुगालला पराभवाचा धक्का

जॉर्जियाने ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या बलाढय़ पोर्तुगाल संघाचा 2-0 गोल फरकाने पराभव करीत युरो चषक फुटबॉल स्पर्धेत धक्कादायक विजय नोंदविला. स्पर्धेची बाद फेरी गाठण्यासाठी जॉर्जियासाठी हा विजय गरजेचाच होता.

रोनाल्डोचा चाहता असलेल्या ख्विचा कवारात्सखेलियाने 93व्या सेपंदाला सुरेख मैदानी गोल करत जॉर्जियाला सनसनाटी सुरुवात करून दिली. जॉर्जेस एम. याच्या पासवर कवारात्सखेलियाने हा भन्नाट गोल केला. त्यानंतर याच जॉर्जेसने लढतीत 57 व्या मिनिटाला गोल करून जॉर्जियाची आघाडी दुप्पट केली. पोर्तुगालला या लढतीत एकही गोल करता आला नाही. मात्र रोनाल्डोच्या संघाने याआधीच बाद फेरीत प्रवेश केलेला आहे. ‘एफ’ गटातून बाद फेरी गाठणारा जॉर्जिया हा तिसरा संघ ठरला. आता अंतिम 16 मध्ये जॉर्जियाला स्पेनचे आव्हान असेल, पोर्तुगालची गाठ स्लोवेनिया संघाशी पडेल.