मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मिंधे गटात गँगस्टरचा प्रवेश; फोटो शेअर करत संजय राऊत यांचा घणाघात

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नामचीन गुंडांचा मिंधे गँगमध्ये प्रवेश होत असून महाराष्ट्रात गुंडांनी गुंडांसाठी चालवलेले राज्य आहे, असा जबरदस्त घणाघात शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी आज केला. पुराव्यादाखल त्यांनी पुण्याचा कुख्यात गुंड जितेंद्र जंगम आणि मुख्यमंत्र्यांचा एकत्र फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे.

संजय राऊत यांनी ‘एक्स’ नेटवर्किंग साईटवर हा फोटो पोस्ट केला आहे. मागील वर्षी पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणुकीवेळी जितेंद्र जंगमने मिंधे गटात प्रवेश केला. त्यावेळचा हा फोटो आहे. जंगमवर हत्येचा प्रयत्न, मारामारी, खंडणी असे सात गंभीर गुन्हे नोंद आहेत.

संजय राऊत यांनी या फोटोबरोबरच असे नमूद केले आहे की, ‘पुण्याच्या नव्या पोलीस आयुक्त महोदयांनी काल म्हणे गुंडांची परेड घेऊन इशारा दिला. राजकारण्यांच्या आसपास फिरकायचे नाही वगैरे…छान! काही गुंड टोळय़ा आणि त्यांचे प्रमुख मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत थेट मिंधे गँगमध्ये प्रवेश करीत आहेत. त्यांची परेड काढणार काय? हातात भगवा घेतलेले हे महात्मा कोण आहेत? हा पुण्यातला गुन्हेगार आहे… याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, चोरी, अपहरण असे गुन्हे आहेत व मोक्कामधून नुकताच तो बाहेर आला आहे. महाराष्ट्रात गुंडांनी गुंडांसाठी चालविलेले राज्य! (काल सरकारचे बाळराजे कोठे होते? त्यांच्या खास गँगबरोबर सुलतानपूर रिसॉर्टमध्ये साग्रसंगीत बरेच काही करीत होते… या राज्याचे कठीण आहे.).’