एलिफंटा लेण्यांचे प्रवेशद्वार धोकादायक, देश-विदेशातील पर्यटकांचा जीव धोक्यात

देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या एलिफंटा लेण्यांचे प्रवेशद्वार सध्या धोकादायक बनले आहे. तीन नंबरच्या प्रवेशद्वाराचा स्लॅब निखळला असून त्यातील लोखंडी शिगादेखील बाहेर आल्या आहेत. त्यामुळे हे प्रवेशद्वार कोसळून मोठा अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. या दुर्दशेमुळे जगभरातील पर्यटकांचा जीव धोक्यात आला असून पुरातत्त्व खाते मात्र कुंभकर्णी झोपेत असल्याचे दिसून आले आहे. धोकादायक झालेले प्रवेशद्वार दुरुस्त करण्यासाठी बजेटमध्ये तरतूदच केली नसल्याची धक्कादायक बाबही निदर्शनास आल्याने पर्यटक व इतिहासप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे.

विविध देशांमधून दरवर्षी बारा लाखांहून अधिक पर्यटक ही नयनरम्य लेणी पाहण्यासाठी एलिफंटाला भेट देत असतात. गेट वे ऑफ इंडियाहून बोटीने हे पर्यटक जात असल्याने स्थानिकांच्या उद्योगालाही मोठ्या प्रमाणावर चालना मिळत असते. काळ्या पाषाणात सहाव्या शतकामध्ये कोरलेल्या या अप्रतिम लेण्यांना वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा मिळाला आहे. या ठिकाणी भव्य शिवलिंग, २१ फूट उंचीची भव्यदिव्य महेश मूर्ती, योगेश्वर शिव, रावणानुग्रह शिवमूर्ती, अर्धनारी नटेश्लवर, गंगाधर शिवमूर्ती, अंधकारसूर बधमूर्ती, नटराजशिव शिवाचे दर्शन घेता येते.

लेण्यांचा अभ्यास करण्यासाठी जगभरातून अभ्यासक येतात. मात्र या मौल्यवान वास्तूच्या देखभाल दुरुस्तीकडे पुरातत्त्व विभागाने सपशेल दुर्लक्ष केले आहे.

एलिफंटा लेण्यांच्या धोकादायक प्रवेशद्वाराची दुरुस्ती करण्यासाठी यावर्षीच्या बजेटमध्ये तरतूदच नसल्याचे पुरातत्त्व विभागाच्या मुंबई विभागाचे अधिकारी व एलिफंटा केव्जचे केअरटेकर कैलास शिंदे यांनी सांगितले.

37 वर्षापूर्वी झाली होती दुर्घटना 

लेणी क्रमांक ३ च्या प्रवेशद्वारावरील छत 1987 साली कोसळून दुर्घटना घडली होती. त्यानंतर त्याची दुरुस्ती करण्यात आली. लोखंडी सळया आणि सिमेंट काँक्रीटचा वापर करून पूर्वीप्रमाणेच हुबेहूब छत व स्तंभ उभारले होते. नंतर त्याची कोणतीही देखभाल न ठेवल्याने पुन्हा या प्रवेशद्वाराची दुर्दशा झाली आहे.