सलामीवीर बेन डकेटच्या 114 धावांच्या खेळीमुळे इंग्लंड 2 बाद 211 अशा जबरदस्त स्थितीत होता. पण साजिद खानच्या फिरकीने अवघ्या दहा चेंडूंत इंग्लंडच्या डावाला तीन धक्के देत पाकिस्तानला सुस्थितीत आणले. पाकिस्तानचा पहिला डाव 366 धावांवर संपल्यानंतर इंग्लंडने आक्रमक खेळ केला, पण दुसऱया दिवसाचा खेळ संपतासंपता त्यांची 6 बाद 239 अशी घसरगुंडी उडाली होती. खेळ थांबला तेव्हा जॅमी स्मिथ (12) आणि ब्रायडन कार्स (2) खेळत होते.
मंगळवारी पदार्पणवीर कामरान गुलाम आणि सईम अयुबच्या शतकी भागीने पाकिस्तानच्या डावाला बळकटी मिळाली होती. मंगळवारच्या 5 बाद 259 या धावसंख्येत सलमान आगा (32)आणि आमीर जमालने (37) यांनी 38 धावांची भर घातली तर तळाला नोमन अलीने 32 धावांची खेळी करत संघाला 350चा टप्पा ओलांडून दिला.
डकेटचे वेगवान शतक
इंग्लंडने आजही आपल्या बॅझबॉलचा खेळ केला. झॅक क्राऊली आणि बेन डकेट यांनी 73 धावांची झंझावती सलामी दिली. मग ओली पोपसह 52 धावांची भागी रचली. त्यानंतर डकेट आणि जो रुटनेही वेगवान खेळ करत 86 धावांची भागी करत संघाला द्विशतकापार नेले. पण आज रुटची खेळी 34 धावांवरच संपली. डकेटने आपले चौथे शतक 120 चेंडूंत साकारले, पण त्याचा शतकी झंझावात फार काळ लांबला नाही.
साजिदने दहा चेंडूंत केली कमाल
आपली पाचवीच कसोटी खेळत असलेल्या साजिद खानने आपले पहिले यश ओली पोपचा त्रिफळा उडवत घेतले. इंग्लंड 2 बाद 211 अशा जबरदस्त स्थितीत असताना साजिदच्या फिरकीने कमाल केली. आधी त्याने रुटची यष्टि वाकवत पाकिस्तानला मोठे यश मिळवून दिले आणि मग पुढच्याच षटकात डकेटची विकेट काढली. एवढेच नव्हे तर गेल्या कसोटीत त्रिशतक झळकावणाऱया हॅरी ब्रुकचाही (9) त्रिफळा उद्ध्वस्त करत खळबळ माजवली. मग नोमान अलीने बेन स्टोक्सला (1) बाद करत इंग्लंडची 6 बाद 225 अशी बिकट अवस्था केली. सजिदने आपल्या दहा चेंडूंत इंग्लंडची फलंदाजी खिळखिळी केली. त्याने 86 धावांत 4 विकेट टिपले.