टेस्लाचे सर्वेसर्वा एलन मस्क यांची संपत्ती तब्बल 400 बिलियन डॉलर्सच्या जवळ आली आहे. 2024 हे वर्ष संपण्यास अजून काही दिवस बाकी आहेत. मस्क यांची एकूण संपत्ती 384 अब्ज झाली आहे. या संपत्तीत 16 अब्जची भर पडल्यास त्यांची संपत्ती 400 पार होईल. मस्क हा जादूई आकडा या वर्षात गाठणार की पुढच्या वर्षात गाठणार, हे लवकरच स्पष्ट होईल. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाल्यानंतर मस्क यांच्या संपत्तीत कमालीची वाढ होताना दिसत आहे. 5 नोव्हेंबरपासून मस्क यांच्या संपत्तीत 120 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे, तर वर्षभरात 150 अब्ज डॉलर्सची वाढ झालीय.
ब्लूमबर्ग द्विवार्षिक निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार, मस्क यांच्या संपत्तीत नुकतीच 8 अब्ज डॉलर्सची भर पडली आहे. त्याआधी अवघ्या एका दिवसात 14 अब्ज डॉलर्सची भर पडली होती. ज्या वेगाने मस्क यांची संपत्ती वाढत आहे, त्यानुसार 400 अब्ज डॉलर्सचा आकडा गाठण्यास त्यांना जास्त वेळ लागणार नाही.