भाजपच्या छुप्या प्रचाराला निवडणूक आयोगाचा दणका; गोरेगावमधील फलकावर महापालिकेने केली कारवाई  

गोरेगावमध्ये सुशोभीकरणाच्या फलकाआडून करत असलेल्या छुप्या प्रचाराची गंभीर दखल घेत अखेर निवडणूक आयोगाने भाजप दणका दिला आहे. म्हाडाच्याकडून करण्यात आलेल्या सुशोभीकरणाच्या कामाचा फलक मुंबई महापालिकेकडून पूर्णपणे झाकण्यात आला आहे. दैनिक सामनामध्ये 27 मार्चला याबाबत बातमी प्रसिद्ध झाली होती.

पेंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा केल्यानंतर आचारसंहिता लागू झाली. मात्र, गोरेगाव पश्चिममध्ये पी-दक्षिण विभागात म्हाडामार्फत केलेल्या सुशोभीकरणाचा फलक अर्धवट झाकला होता. या अर्धवट फलकाआडून भाजप छुपा प्रचार करत असल्याच्या तक्रारी परिसरातील रहिवासी करत होते. त्याबाबत दैनिक सामनामध्ये छायाचित्रासह बातमी प्रसिद्ध झाल्यावर महापालिकेच्या पी-दक्षिण विभागाने तातडीने कारवाई करत हा फलक पूर्णपणे झाकला आहे.