निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यानंतर आयोगाला आली जाग, राजकीय पक्षांना दिली समज

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचं मतदान 20 मे रोजी पार पडलं. आता लवकरच सहाव्या आणि सातव्या टप्प्याचं मतदान होईल. यापूर्वी निवडणूक आयोगाने राजकीय पक्ष आणि स्टार प्रचारकांना समज दिली आहे. गंमत म्हणजे पाच टप्पे उलटल्यानंतर आता आयोगाने पक्षांना समज दिली आहे.

निवडणूक आयोगाने भाजपला आणि त्याच्या स्टार प्रचारकांना धार्मिक किंवा सांप्रदायिक विषयांवर प्रचार करू नका अशी समज दिली आहे. आयोगाने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, भाजप सध्या सत्ताधारी पक्ष आहे. हिंदुस्थान या देशाची संरचना ही सार्वभौम आणि संवेदनशील आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्ष म्हणून या संरचनेला धक्का लागू न देणं ही भाजपची जबाबदारी आहे. त्यामुळे सर्व स्टार प्रचारकांनी आदर्श आचार संहितेचं पालन करत कोणतंही प्रतिबंधित वक्तव्य करू नये, असं आयोगाने पत्रात म्हटलं आहे.

तर काँग्रेसला सैन्यावर टिप्पणी न करण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच, कोणत्याही पक्षाने किंवा त्याच्या उमेदवाराने दोन जाती किंवा धर्मांत फूट पाडणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या कृतीत सहभागी होता कामा नये, असंही आयोगाने म्हटलं आहे. मात्र, ही समज आयोगाने आचार संहिता लागू केल्यानंतर लगेच देणं गरजेचं असताना निवडणुकीचे पाच टप्पे उलटून गेल्यानंतर दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.