निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; उद्धव ठाकरे यांची मागणी मान्य, निधी स्वीकारण्यास शिवसेनेला परवानगी

केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय जाहीर केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सार्वजनिक निधी स्वीकारण्यास निवडणूक आयोगाने मंजुरी दिली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने ही माहिती दिली आहे. हा निर्णय म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मोठा विजयच मानला जात आहे. विशेष म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी हा निर्णय आल्याने शिवसेनेला मोठे बळ मिळाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यानंतर शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही निवडणूक आयोगाकडे याबाबत मागणी केली होती. आता निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मागणी मान्य केली आहे. यासंदर्भात स्वतः निवडणूक आयोगाने माहिती दिली आहे.

काय म्हटले निवडणूक आयोगाने?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सार्वजनिक निधी स्वीकारू शकतो. सर्व राजकीय पक्षांचा निधी नियंत्रित होतो त्या लोकप्रतिनिधी कायदा 1951 च्या कलम 29 ब आणि कलम 29 क नुसार सरकारी कंपनी व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्ती किंवा कंपनीने दिलेला कोणताही निधी स्वेच्छेने स्वीकारण्यास पक्षाला मंजुरी देण्यात आली आहे, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने म्हटले आहे.