महाराष्ट्रात विधानसभेच्या महायुद्धाचे ऐलान, एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबरला मतदान

महाराष्ट्रातील फोडाफोडीच्या राजकारणाला जनता वैतागली आहे. आमदार अपात्रतेच्या निर्णयाबाबत सर्वोच्च न्यायालयाचे ‘तारीख पे तारीख’ सुरू आहे. यामुळे गद्दारांना धडा शिकविण्याची संधी कधी मिळते याकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या विधानसभा निवडणुकीचे बिगूल आज वाजले. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात विधानसभेच्या 288 जागांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. मिंधे सरकारची राजवट संपून 25 नोव्हेंबरनंतर राज्यात नवे सरकार अस्तित्वात येणार आहे.

केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. महाराष्ट्र विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरला संपत आहे. त्याआधीच राज्यातील सार्वत्रिक निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे राजीव कुमार यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात एकूण 9 कोटी 63 लाख मतदार आहेत. 4 कोटी 66 लाख महिला तर 4 कोटी 98 लाख पुरुष मतदार आहेत. 1 लाख 186 मतदान केंद्रांवर मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.

लोकसभेच्या वेळी झालेल्या चुका टाळणार

आम्ही काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचा दौरा केला होता. राज्यात निवडणुकीची तयारी योग्य प्रकारे झाली की नाही याची माहिती आम्ही घेतली. लोकसभा निवडणुकीच्या वेळी झालेल्या चुका विधानसभा निवडणुकी दरम्यान टाळण्याचा आमचा पूर्णपणे प्रयत्न असेल, असे राजीव कुमार म्हणाले.

गुडगाव, फरीबाद, जुबिली हिल्स, हैदराबाद, बंगळुरू (दक्षिण), गांधीनगर, कुलाबा, पुणे, ठाणे या ठिकाणी मतदानाचा टक्का घसरला. मतदानाचा टक्का कसा वाढवता येईल याबाबत आम्ही लवकर महापालिका आयुक्तांसोबत बैठक घेणार असल्याचेही निवडणूक आयुक्तांनी सांगितले.

महाराष्ट्रात प्रथमच सहा मोठे पक्ष रिंगणात 

महाराष्ट्रात प्रथमच सहा मोठे पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महाविकास आघाडीकडून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी कॉँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि काँग्रेस तर महायुती म्हणून भाजप, मिंधे गट आणि अजित पवार गट हे प्रमुख पक्ष निवडणुकीला सामोरे जाणार आहेत.

आचारसंहिता लागू

निवडणुका जाहीर होताच राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आता निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतरच आचारसंहिता संपणार आहे. आचारसंहितेच्या काळात सरकारला कुठल्याही प्रकारची नवीन घोषणा करता येणार नाही. कुठल्याही सरकारी योजना किंवा इमारतीचं अनावरण, लोकार्पण किंवा भूमिपूजन केलं जाऊ शकत नाही. सरकारी खर्चातून असं एकही काम केलं जाऊ शकत नाही.

मुंबईच्या आयुक्तांना कडक आदेश, मतदारांची गैरसोय अजिबात नको

लोकसभा निवडणुकीत मुंबईतील मतदान पेंद्रावर भल्या मोठय़ा रांगा दिसून आल्या होत्या. मत नोंदवण्यासाठी काहींना अनेक तास रांगेत उभे राहावे लागले होते. यासंदर्भात अनेक तक्रारी आल्या होत्या. विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदारांची गैरसोय टाळण्यासंदर्भात कठोर निर्देश मुंबई महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. मतदान केंद्र दोन किलोमीटरच्या असावे त्याचबरोबर रांगेत उभे असलेल्या मतदारांसाठी खुर्ची किंवा बेंच ठेवावे, पिण्याच्या पाण्याची सोय करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे राजीव कुमार म्हणाले.

हिंसाचार खपवून घेणार नाही

दोन दिवसांपूर्वी माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची हत्या झाली. या घटनेकडे निवडणूक आयुक्तांचे लक्ष वेधले असता राजीव कुमार म्हणाले, आम्ही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. पोलीस आणि प्रशासनाला सांगतो कोणत्याही प्रकारची हिंसा आणि गुन्हेगारी होता कामा नये. विधामनसभेच्या निवडणुकीदरम्यान कोणत्याही प्रकारचा हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही. राजकीय नेत्यांवर हल्ले होता कामा नये, असे निर्देश राजीव कुमार यांनी पोलीस आयुक्तांना दिले.

महायुती एकाच टप्प्यात पराभूत होईल

महायुतीचे सरकार घाबरले आहे. महायुती वाट्टेल त्या घोषणा करून पुन्हा सत्तेवर येण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, हे महाराष्ट्राला कळून चुकलेलं आहे. या निवडणुकीत पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा विजय होणार आहे. महाराष्ट्रात एका टप्प्यात निवडणूक होत आहे. त्यामुळे आता महायुती एका टप्प्यात पराभूत होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. लाडक्या बहिणींना आम्ही महायुतीपेक्षाही जास्त फायदे देऊ, असे त्यांनी सांगितले.

…तो क्षण आला, आता मतदारच न्याय देतील

‘महाराष्ट्रातील जनता ज्या क्षणाची वाट पाहत होती तो क्षण जवळ आला आहे. 20 नोव्हेंबर हा मतदानाचा दिवस आहे. दोन वर्षांत महाराष्ट्राला लुटणाऱया शिंदे-भाजप सरकारला हुसकावून लावण्यासाठी बदल घडवायचा आहे. आम्ही न्यायसंस्थेकडून न्यायाची वाट पाहत होतो, पण आता जनताच न्याय करणार आणि मशाल धगधगणार,’ अशी पोस्ट शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी एक्सवर केली.

भ्रष्ट महायुती सरकारला सत्तेतून खाली खेचा 

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस व महाविकास आघाडी सज्ज आहे. महायुती सरकारने अडीच वर्षांत प्रचंड भ्रष्टाचार केला आहे. तिजोरीत पैसा नाही, निधीची तरतूद नाही. असे असतानाही दोन महिन्यांत सरकारने केवळ जनतेची दिशाभूल करणाऱया घोषणा केल्या आहेत. विधानसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून केवळ घोषणाबाजी केली असून ते सर्व चुनावी जुमले आहेत, असे प्रतिपादन काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केले आहे.

गर्दीच्या ठिकाणी मतदारांना सुविधा

मतदानासाठी लागणाऱया भल्या मोठय़ा रांगांचा विचार करता मतदान केंद्रांच्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. ठराविक अंतरावर मतदारांना बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. ज्येष्ठ मतदार, महिला, दिव्यांगांना याचा लाभ होईल. तसेच मतदान केंद्रांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा असणार आहे.

मतदानाचे व्हिडिओ चित्रीकरण

उमेदवाराचा अर्ज भरणे, उमेदवारांच्या प्रचार फेऱया, सभा याचबरोबर मतदान केंद्रांवरील सर्व गोष्टींचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार असून ज्या ज्येष्ठ मतदारांचे घरी जाऊन मतदान घेण्यात येणार आहे त्याचेही चित्रीकरण करून रेकॉर्ड ठेवले जाणार.

24 तास वॉच

मतदारांना कोणत्याही प्रकारचे प्रलोभन देणे, पैसे वाटप करणे, दारू आणि अमली पदार्थांचे वाटप करणे यावर निवडणूक आयोगाचे बारीक लक्ष असणार आहे. सर्वत्र चेकपोस्टवर वॉच ठेवण्यात येणार आहे. 24 तास एक्साईजचे अधिकारी आणि इतर अधिकारी चेक पोस्टवर राहतील.

एक्झिट पोल बकवास, विट आणणारे… कलही बोगस

हरयाणा विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल पूर्णपणे चुकीचे ठरले. त्यावरून राजीवकुमार यांना प्रश्न विचारला असता, एक्झिट पोल बकवास आणि विट आणणारे असतात. कलही बोगस असतात, असे नमूद करत त्यांनी संताप व्यक्त केला व संबंधित संस्था आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला.

– मतदान संपल्यापासून साधारण तिसऱया दिवशी मतमोजणी होते. पण मतदान संपतं त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजल्यापासूनच काय होणार हे सांगितलं जातं. परंतु यासाठी कोणताही वैज्ञानिक आधार नसतो.

– पोलची सॅम्पल साइज काय आहे, सर्वेक्षण कुठे केले गेले, त्याचा निकाल कसा लागला, निकाल जुळत नसेल तर माझी काही जबाबदारी आहे की नाही? या सगळ्या गोष्टी सर्व्हे करणाऱयांनी पाहण्याची गरज आहे.

– आम्ही एक्झिट पोलवर नियंत्रण ठेवत नाही. आमचे हात बांधलेले आहेत पण याकडे लक्ष देण्याची गरज आहे. एनबीएससारख्या काही संस्था एक्झिट पोलचे संचालन करतात. या संस्थांनी आत्मपरीक्षण करावे.

– मतमोजणी प्रत्यक्षात 8.30 वाजता सुरू होते. सकाळी 8.50 वाजेच्या आधी पहिला कल येऊ शकत नाही. मग 8 नंतर दहा मिनिटांत कल कसे काय दाखवतात? एक्झिट पोल खरे हे सिद्ध करण्यासाठी तर हा खटाटोप नसतो ना?

गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना ताकीद 

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना त्यांची पार्श्वभूमी तीन वेळा वृत्तपत्रात द्यावी लागेल. आम्ही महाराष्ट्रात बैठका घेतल्या तेव्हा यासंदर्भातील निर्देश राज्य निवडणूक आयोग आणि अधिकाऱयांना दिल्या आहेत, असेही राजीव कुमार म्हणाले. दरम्यान, सर्व पोलिंग स्टेशन 2 किलोमीटरच्या आत असावेत यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे तुतारी चिन्ह मोठय़ा आकारात असेल 

नुकत्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत पिपाणी आणि तुतारी या दोन चिन्हांमुळे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फटका बसला होता. यावेळी हा गोंधळ टाळण्यासाठी काय खबरदारी घेतली, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. याला उत्तर देताना राजीव कुमार म्हणाले, तुतारी वाजविणाऱया माणसाला मतदान यंत्रावर कशा पद्धतीने दाखवले गेले पाहिजे, हे तुम्हीच आम्हाला सांगा, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसला केल्याचे राजीव कुमार यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आम्हाला ज्या पद्धतीचे चिन्ह दिले गेले आहे, ते आम्ही मान्य केले आहे. यावेळी त्यांचे चिन्ह आकाराने मोठे दाखवले जाईल तसेच पिपाणी चिन्ह आणि तुतारी वाजविणारा माणूस यांचा एकमेकांशी काहीच संबंध नाही. त्यामुळे पिपाणी चिन्ह हटवले जाणार नाही, असे राजीव कुमार म्हणाले.

ज्येष्ठ नागरिकांना घरूनच मतदान करता येणार 

85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना घरून मतदान करता येणार आहे. ही सुविधा घेण्यास इच्छुक असलेल्या पात्र ज्येष्ठ मतदारांना ‘12 ड’ हा अर्ज भरावा लागेल. हा अर्ज भरून घेण्यासाठी मतदान पेंद्रस्तरीय अधिकारी त्यांची घरी जाऊन भेट घेणार आहेत. यावेळी उमेदवारांनाही सोबत घेतले जाईल. त्यांना रूटचार्ट देण्यात येईल असेही निवडणूक आयुक्तांनी सांगितले. निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाल्यापासून पाच दिवसांपर्यंत हा अर्ज भरून देता येईल. या मतदारांच्या गोपनीयतेची संपूर्ण काळजी घेतली जाईल, त्याबाबतची सर्व व्यवस्था आम्ही केली आहे अशी माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली. 40 टक्क्यांहून अधिक अपंगत्व असणाऱयांनाही घरून मतदान करण्याची सुविधा दिली जाणार आहे.

टक्का वाढवण्यासाठी 

मुंबई, पुण्यासारख्या शहरांत कमी मतदान होते. हे लक्षात घेऊन मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले. विकेण्ड पकडून मोठय़ा संख्येने मतदार बाहेरगावी जातात, असे याआधी निदर्शनास आले आहे. याबाबत चिंता व्यक्त करतानाच शहरात जास्तीत जास्त मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडावे, असे आवाहनही त्यांनी केले.