ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट सुविधेविषयी आमची भूमिका मांडण्यासाठी इंडिया आघाडीच्या नेत्यांना तुम्हाला भेटण्याची एकदा तरी संधी द्या, अशी विनंती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना पुन्हा एकदा केली आहे.
इंडिया आघाडीने 19 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या बैठकीत व्हीव्हीपॅटच्या वापराविषयी एक ठराव मंजूर केला होता. या ठरावाची प्रत देऊन त्या अनुषंगाने राजीव कुमार यांच्याशी चर्चा करण्यासाठी 20 डिसेंबर 2023 रोजीही आघाडीच्या नेत्यांनी भेटीची वेळ मागितली होती. पण अद्याप तरी आम्हाला वेळ देण्यात आलेली नाही, असे रमेश यांनी म्हटले आहे.
इंडिया आघाडीतील पक्षांनी ईव्हीएमसंदर्भात व्यक्त केलेल्या चिंतेविषयी एक निवेदन 9 ऑगस्ट 2023 रोजी आयोगाला सादर करण्यात आले असल्याकडेही रमेश यांनी राजीव कुमार यांचे लक्ष वेधले आहे. आतापर्यंत 9,10,16,18 आणि 23 ऑगस्ट 2023 रोजी आयोगाला भेटीची वेळ देण्यासाठी वारंवार विनंती करण्यात आली होती. तेव्हा 23 ऑगस्ट 2023 रोजी आयोगाने वेबसाईटवरील ईव्हीएमविषयीची माहिती आणि प्रश्नोत्तरे पाहण्याची सूचना केली आणि ईव्हीएमला कायदा व कोर्टाची कशी मान्यता आहे याचा संक्षिप्त तपशील दिला होता. मात्र इतक्या वेळा विनंती करूनही आघाडीच्या शिष्टमंडळाला आयुक्तांना भेटण्याची वेळ दिली गेली नाही, असे रमेश यांनी सांगितले.
– तुम्ही काँग्रेसच्या चिन्हाचे बटण दाबल्यावर व्हीव्हीपॅट यंत्रणेने तुम्हाला सात सेकंद हाताचा पंजा दाखवला आणि नंतर मात्र यंत्रात कमळ चिन्ह तुमचे मत म्हणून प्रिंट झाले तर तुम्हाला कळणार तरी कसे, असा प्रश्न दिग्विजय सिंह यांनीही उपस्थित केला आहे
– त्यापेक्षा मतदारांना त्यांच्या मताची प्रिंट द्यावी आणि ती मतपेटय़ांमध्ये जमा करून नंतर मतमोजणी करावी, अशी मागणी त्यांनी केली. नरेंद्र मोदी आणि आयोगाला ईव्हीएमविषयी एवढेच जर प्रेम असेल तर मताची प्रिंट मतपेटीत जमा करण्यासाठी ते मतदारांना का देत नाहीत, असे त्यांनी एक्सवर म्हटले आहे.
आयोगाची ठोकळेबाज उत्तरे
काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे यासंदर्भात राजीव कुमार यांच्याकडे आधीही भेटीची वेळ देण्यासाठी विनंतीपत्रे देण्यात आली आहेत. मात्र प्रत्येक वेळी आयोगाकडून ईव्हीएम संदर्भात आयोगाच्या साईटवर असलेली माहिती आणि प्रश्नोत्तरे पाहावीत, असे ठोकळेबाज उत्तर देण्यात आल्याचे रमेश यांनी 30 डिसेंबर 2023 रोजी मुख्य निवडणूक आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात निदर्शनास आणून दिले आहे. तुम्हाला आणि तुमच्या सहकाऱयांना काही मिनिटे तरी भेटून व्हीव्हीपॅट संदर्भात भूमिका मांडण्याची संधी इंडिया आघाडीच्या तीन-चार सदस्यांच्या मंडळाला द्यावी, अशी मी पुन्हा विनंती करतो, असे रमेश यांनी या पत्रात म्हटले आहे.