पोलीस दलातील बदल्यांमध्ये मिंधेंची मनमानी; मर्जीतल्या अधिकाऱ्यांची मुदत संपूनही बदली नाही!

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पोलीस दलातील बदल्यांच्या घोळाची गुरुवारी महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणाने (मॅट) गंभीर दखल घेतली. मुंबई व नवी मुंबईतील मर्जीतल्या 20 अधिकाऱ्यांची तीन वर्षांची मुदत संपल्यानंतरही बदली केलेली नाही. यातून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या गाईडलाईन्सची मिंधे सरकारने पायमल्ली केली. याबाबत ‘मॅट’ने पोलीस प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला आणि मुंबईचे सहपोलीस आयुक्त व पोलीस महानिरीक्षकांना शुक्रवारीच हजर राहून बदल्यांच्या घोळाबाबत खुलासा करण्याचे आदेश दिले.

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह अन्य पोलीस निरीक्षकांपैकी 111 अधिकाऱयांच्या बदल्या करण्यात आल्या. बदल्यांत मोठा घोळ झाल्याचे उघडकीस आले असून काही पोलीस अधिकाऱयांनी बदली आदेशाविरोधात ‘मॅट’चे दार ठोठावले. त्यांच्या अर्जावर गुरुवारी ‘मॅट’च्या अध्यक्षा मृदुला भाटकर यांच्यासमोर सुनावणी झाली.

यावेळी अर्जदार पोलीस अधिकाऱयांच्या बदल्या नियमानुसारच झाल्याचा दावा मुख्य सादरकर्ता अधिकारी स्वाती मंचेकर यांनी केला. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर ‘मॅट’ने पोलीस प्रशासनावर चांगलाच संताप व्यक्त केला. बदल्यांची प्रक्रिया 20 ऑगस्टपर्यंत करणे अपेक्षित असताना 4 ऑक्टोबरला बदल्या का केल्या, असा सवाल करीत ‘मॅट’ने प्रशासनाकडून खुलासा मागवला आहे. मुंबई व नवी मुंबईतील 20 अधिकारी बदलीसाठी पात्र असताना त्यांच्या बदल्या का केल्या नाहीत, याचाही प्रतिज्ञापत्राद्वारे खुलासा करण्याचे आदेश डीजीपी कार्यालयाला दिले. त्यामुळे मर्जीतल्या अधिकाऱयांवरील मेहेरनजरचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.

निवडणूक आयोगाची परवानगी घेतली होती का?

केंद्रीय निवडणूक आयोगाने पोलिसांच्या बदल्यांसाठी नियमावली दिली होती. त्यासाठी मुदतही दिली होती. तरीही तुम्हाला अधिकाऱयांच्या बदल्या करायला उशीर झाला. उशिरा बदल्या करताना निवडणूक आयोगाची परवानगी घेतली होती का, असा सवाल ‘मॅट’ने प्रशासनाला केला.

– विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिव सुवर्णा केवळे यांनी सुनावणीला हजर राहून योग्य ते सहकार्य करावे तसेच आयजी (आस्थापना) के. एम. प्रसन्ना यांनीदेखील सुनावणीसाठी हजर रहावे, असेही आदेश ‘मॅट’ने दिले आहेत.
नियमानुसार बदल्या झाल्याच नाहीत
– पोलीस निरीक्षकाने आयुक्तालयात किंवा अधीक्षक क्षेत्रात तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर बदली होते.
– मुंबईत दोन जिल्हे येतात. त्यामुळे एका आयुक्तालयातून दुसऱया आयुक्तालयात अधिकाऱयाची बदली करायची असल्यास आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आस्थापना मंडळ निर्णय घेते.
– बदल्यांबाबत संपूर्ण प्रक्रियेचे पालन करा, असे निवडणूक आयोगाने पोलीस प्रशासनाला सांगितले होते. तसे न करताच पोलिसांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले, असे अॅड. अरविंद बांदिवडेकर यांनी ‘मॅट’च्या निदर्शनास आणले.

अॅड. प्रशांत नागरगोजे यांचा युक्तिवाद

अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजीव चौव्हान व भोईवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष कोकरे यांच्या बदल्याच्या आदेशाला ‘मॅट’ने स्थगिती दिली होती. तरीही या अधिकाऱयांना काम करू दिले जात नाही. ही ‘मॅट’च्या आदेशाची पायमल्ली आहे, असा युक्तिवाद अॅड. प्रशांत नागरगोजे यांनी केला.