मिंधे गटाच्या वामन म्हात्रेने बदलापुरातील पीडित मुलीचे नाव उघड केले

 बदलापूर येथील एका शाळेत दोन चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील एफआयआर मिंधे गटाचा शहरप्रमुख वामन म्हात्रे याने समाजमाध्यमांवर व्हायरल केल्याचा आरोप त्या पीडित चिमुकलीच्या आईने केला आहे. म्हात्रे याने पीडित मुलीची ओळख, नाव, पत्ता उघड केल्याने आम्हाला भयंकर मनस्ताप भोगावा लागत असून म्हात्रे आणि त्याच्या साथीदारावर ‘पोक्सो’ कायद्याखाली गुन्हा दाखल करा, अशी तक्रार पीडित मुलीच्या आईने बदलापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन केली आहे.

बदलापूर येथील एका नामांकित शाळेत शिकणाऱया चार वर्षांच्या दोन चिमुकलींवर त्याच शाळेतील सफाई कामगाराने लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर 16 ऑगस्ट रोजी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर लगेचच या गुन्हय़ाची एफआयआर का@पी काही व्हॉटस्अॅप ग्रुपवर व्हायरल झाली. एका महिला पत्रकाराशी अश्लील संभाषण केल्याप्रकरणी विनयभंग आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेला आरोपी वामन म्हात्रे आणि महेंद्र शेळके यांनी ही एफआयआर का@पी व्हायरल केल्याचे पुरावेच पीडित चिमुकलीच्या आईने बदलापूर पोलिसांना आज दिले.

बाललैंगिक अत्याचारातील पीडितेचे नाव उघड करण्यास न्यायालयाची मनाई

बाललैंगिक अत्याचार प्रकरणात पीडित मुलगी किंवा तिच्या पुटुंबाची ओळख उघड करण्याची मनाई असते. तसे न्यायालयाचे सक्त आदेश आहेत. मात्र या प्रकरणातील एफआयआर का@पी वामन म्हात्रे याने जाहीर केल्याने पीडित चिमुकलीचे नाव, तिचा पत्ता, तिची ओळख जगजाहीर झाली आहे.

कायद्याचे राज्य आहे की नाही?

या प्रकरणाचा भयंकर परिणाम आमच्या कुटुंबावर झाला आहे. अनेक लोक, पत्रकार रात्री-अपरात्री आमचे दार वाजवून आम्हाला भेटायला येत आहेत. या प्रकरणाने आम्ही व आमची मुलगी अधिकच घाबरून गेलो आहोत. तिची अशी सार्वजनिक ओळख तिच्या भवितव्यासाठी घातक आहे. वामन म्हात्रेला ती एफआयआर क़ॉपी मिळालीच कशी? महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे की नाही? हा सगळा प्रकार संशयास्पद असून यातून काही बरेवाईट घडले तर जबाबदारी वामन म्हात्रे आणि महेंद्र शेळके यांची राहील. या दोघांवरही पोक्सोअंतर्गत तत्काळ गुन्हा दाखल करा, अशी फिर्यादच पीडितेच्या आईने पोलिसांना दिली आहे.