मुख्यमंत्र्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींसमोर मतांसाठी झोळी पसरली, महिलांनी फिरवली पाठ

राज्यातील महायुती सरकारने महिलांना सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसह विविध योजना सुरू केल्या. तुमच्या खात्यावर नोव्हेंबर महिन्याचा दीड हजार रुपयांचा अ‍ॅडव्हान्स जमा केला. तुम्हाला सगळं दिलं आतातरी विधानसभा निवडणूकीत महायुतीला पुन्हा सत्तेवर आणण्याकरिता आणि या योजना पुढे सूरू ठेवण्यासाठी आम्हाला विसरू नका, असे म्हणते मुख्यमंत्र्यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींसमोर मतांसाठी झोळी पसरली.

छत्रपती संभाजीनगर येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसह वचनपूर्ती मेळावा घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे, गृहनिर्माणमंत्री अतूल सावे, पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह लोकप्रतिनिधींची व्यासपीठावर उपस्थिती होती.

मुख्यमंत्र्यांनी मागितले आशिर्वाद

याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, हे सर्वसामान्यांचे सरकार असल्यामुळेच महिलांना सक्षम करण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहे, मात्र, लोकसभा निवडणूकीत विरोधकांनी नॅरेटिव्ह पसरविल्यामुळे राज्यात महायुतीच्या जास्त जागा निवडूण आल्या नाहीत. आता मात्र विधानसभा निवडणूकीत बहिणींसाठी खूप योजना राबविण्यात येत असून या योजना पुढे सुरू ठेवण्यासाठी महायुतीचे हात बळकट करा, तुमच्या भावांना आशिर्वाद द्या असे ते म्हणाले.

फडणवीस म्हणाले पाठिंबा द्या

तर उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महायुती सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या योजना पुढेही सुरू ठेवण्यासाठी तुमचा आशिर्वाद आणि पाठिंबा असू द्या, असे आवाहन केले.

अजित पवार म्हणाले विसरू नका

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, महिलांसाठी सुरू केलेल्या योजना पुढे चालू ठेवायच्या असतील तर विधानसभा निवडणूकीत महायुतीच्या उमेदवारांना मतदान करावे लागेल. महिनाभर अगोदरच तुम्हाला भाऊबीज दिली असून आता आम्हाला कधीही विसरू नका, असे पवार म्हणाले. आगामी विधानसभा निवडणूकीसाठी मुख्यमंत्र्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींसमोर मतांसाठी झोळी पसरली.

मुख्यमंत्र्याचे भाषण सुरू होताच महिला निघाल्या

मुख्यमंत्री शिंदे हे भाषणाला उभे राहताच सभामंडपातून महिलांनी काढता पाय घेतला. महिलांच्या झुंडीच्या झुंडी मैदानातून बाहेर पडत होत्या. भाषण संपेपर्यंत सभामंडप रिकामा झाला होता. त्यानंतरही सरकारी योजनांचे कवित्व संपलेले नव्हते.

महिलांना चक्कर, मळमळ, उलट्या

मेळाव्यात बसलेल्या अनेक महिलांना चक्कर येऊन त्या खाली कोसळल्या तर काहीना मळमळ, डोकेदुखी, उलट्याही झाल्या. मनपाच्या आरोग्य विभागाच्या पथकाने दोन्ही स्टॉलवर मिळून 97 महिलांसह पुरुषांवर उपचार केले.