मोदी सरकारच्या यात्रेत जाणार नाही! परभणीतील आठ अधिकाऱ्यांचा ‘संकल्प’

गावा-गावांमध्ये विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ गेल्यानंतर वाद निर्माण होत आहेत. बर्‍याच गावांत विनाकारण कर्मचारी, अधिकार्‍यांना शिवीगाळ होत आहे. दगडफेक सुद्धा होत आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे येथून पुढे विकसित भारत संकल्प यात्रेकरिता आम्ही काम करणार नाही, असा स्पष्ट निर्णय परभणीच्या पंचायत समितीमधील 8 विस्तार अधिकार्‍यांनी घेतला आहे. तसे लेखीपत्रही त्यांनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना दिले आहे.

परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना दिलेल्या पत्रात अधिकार्‍यांनी वस्तुस्थिती मांडली आहे. मागील अनेक दिवसांपासून विकसित भारत संकल्प यात्रेत झालेल्या विविध घटनांचा आढावा घेत आम्ही सर्वसामान्य जनतेला उत्तरे देऊ शकत नाहीत, असेही स्पष्टपणे पत्रात मांडले आहे. पत्रात म्हटले आहे की, आम्ही विकसित भारत संकल्प यात्रेकरिता समन्वय अधिकारी म्हणून काम करीत आहोत. परंतु बर्‍याच गावांमध्ये विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ गेल्यानंतर वाद निर्माण होत आहेत.

अनेक गावांत विनाकारण कर्मचारी, अधिकारी यांना शिवीगाळ होत आहे. दगडफेक सुद्धा होत आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच संकल्प यात्रेमध्ये खूप प्रमाणात महिला कर्मचारी यांचाही सहभाग आहे. त्यामुळे सर्व कर्मचार्‍यांना संरक्षण मिळणे ही आवश्यक आहे. गावात संकल्प यात्रा जाण्याआगोदरच आम्हाला भ्रमणध्वनीवरून विचारणा होत आहे की, तुम्ही मोदीचा प्रचार का करत आहात? भारत सरकारचा करावा. संकल्प यात्रा रथावर मोदी सरकार असा उल्लेख असल्याने आम्ही त्यांना उत्तरे देऊ शकत नाहीत. वादाच्या घटना घडत आहेत. त्यामुळे यात्रेमध्ये कर्मचारी, अधिकारी यांच्या जीवाला धोका होऊ शकतो. करिता आजपासून विकसित भारत संकल्प यात्रेच्या कामकाजास आदरपूर्वक नकार देत आहोत.

या निवेदनावर एस.व्ही. पानपाटील (विस्तार अधिकारी पंचायत, पं. स., परभणी), एस.एस. सय्यद (विस्तार अधिकारी सांख्यिकी,पं.स. परभणी), डी. आर. कर्‍हाळे (विस्तार अधिकारी आरोग्य, पं.स. परभणी), यू. टी. राठोड (विस्तार अधिकारी आरोग्य, पं.स. परभणी), एस.एस. डोंगरदिवे (विस्तार अधिकारी कृषी,पं.स. परभणी), एस.आर. कुडमुलवार (विस्तार अधिकारी कृषी, पं.स.परभणी), ए.पी. जोशी (विस्तार अधिकारी कृषी, पं.स. परभणी), एस.आर. चिलगर (विस्तार अधिकारी पंचायत, पं.स. परभणी) या आठ अधिकार्‍यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. या निवेनाच्या प्रती जि.प. सीईओ व अन्य अधिकार्‍यांनाही देण्यात आल्या आहेत.

जिल्हाधिकारी म्हणाले, बंदोबस्त देणार
संकल्प यात्रेसाठी काम करणार नाही, असे पत्र आपणास प्राप्त झाले आहे. परंतु त्यांना आपण बंदोबस्त देण्यासाठी आश्वासित केले आहे. त्यांच्या पैकी काही लोकांना मी प्रत्यक्ष बोललो सुद्धा आहे. ग्रामीण भागात काही ठिकाणी प्रतिप्रश्न होऊन वाद झाल्याने त्यांना भीती वाटत असल्यामुळे त्यांनी पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी केली आहे. तो बंदोबस्त दिला जाईल आणि परभणी जिल्ह्यात यापुढेही संकल्प यात्रा सुरूच राहील. केंद्र शासनाच्या योजनांची जनतेला माहिती होणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे म्हणाले.