रोहित पवारांच्या ‘बारामती ऍग्रो’वर ईडीचे छापे

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते – आमदार रोहित पवार यांच्या मालकीच्या ‘बारामती अॅग्रो’ कंपनीवर मुंबईसह सहा ठिकाणी पेंद्रीय तपास यंत्रणा ‘ईडी’ने छापेमारी केली. सकाळपासूनच या छापेमारीला सुरुवात झाली. सायंकाळपर्यंत ती सुरू होती. मात्र या कारवाईमागचा तपशील समजू शकला नाही.

शुक्रवारी सकाळी ईडीचे पथक येथे पोहोचल्यावर पंपनीच्या कार्यालयात अन्य लोकांना प्रवेश बंद करण्यात आला. ईडीचे पथक भाडोत्री वाहनातून येथे पोहोचले. त्यांची सुरक्षारक्षकांशी शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर हे पथक आत गेले. सायंकाळी उशिरापर्यंत ते बाहेर आलेले नव्हते. बारामती एमआयडीसीतील दोन उद्योजकांचीही ईडीने चौकशी केल्याचे कळते.

संघर्षाची तयारी ठेवावी लागेल – रोहित पवार

यासंदर्भात आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून सूचक वक्तव्य केले आहे. त्यात म्हटले आहे की, ‘‘हा आहे स्वाभिमानी महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा चेहरा. ज्यांनी पिढय़ान्पिढय़ा महाराष्ट्र धर्म जपला आणि वाढविला, अन्यायाविरोधात प्रसंगी संघर्ष करण्याची शिकवणही या महान विभूतींनी दिल्याने महाराष्ट्रभूमीला संघर्षाचाही प्रदीर्घ इतिहास आहे. म्हणून मराठी माणूस या नात्याने महाराष्ट्र धर्म जगण्यासाठी आणि टिकविण्यासाठी प्रत्येकाला संघर्षाचीही तयारी ठेवावी लागेल.’’

– यापूर्वी बारामती अॅग्रोच्या शेटफळ गढे (ता. इंदापूर) येथील प्रकल्पाला प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने नोटीस बजावण्यात आली होती. तसेच प्रकल्प बंद करण्याचे आदेशही देण्यात आले होते. याविरोधात पंपनीने उच्च न्यायालयात धाव घेत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटिशीला आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने या प्रकरणी स्थगिती दिली होती.