पराभवातही शान

<<<द्वारकानाथ संझगिरी>>>

‘पायावर कुऱ्हाड मारून घेणे’ ही म्हण जेव्हा कधी जन्माला आली असेल त्यावेळेला गौतम गंभीर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी बंगळुरू कसोटीत जी चूक केली ती कुणीतरी दुसऱ्या एखाद्या क्षेत्रात केली असावी. मग या म्हणीचा जन्म झाला असावा.

टॉस कोणी जिंकला? वातावरण कसं होतं?

तर पावसाळी ढग आकाशात जमलेले आणि पाऊस पडून गेल्यामुळे खेळपट्टीमध्ये दमटपणा असलेला. समोरच्या न्यूझीलंडच्या संघात तीन-तीन अत्यंत दर्जेदार असे वेगवान गोलंदाज होते. तरीही हिंदुस्थानी संघाला पहिली फलंदाजी घ्यावी हे का सुचावं? यालाच पायावर कुऱ्हाड मारून घ्यावी असे म्हणतात. हिंदी सिनेमात हीरो हातात गन घेऊन उभा असतो. समोर निःशस्त्र असा खलनायक असतो. पण हीरो थेट गोळी झाडत नाही. तो हातातली बंदूक फेकून देतो आणि हाताने मारण्याचा प्रयत्न करतो.

का? अतिआत्मविश्वास

कधी कधी फसतो, पण त्यातून बाहेर येतो. कारण तो हीरो असतो. त्याची पटकथा कुणाच्या तरी डोक्यातून आलेली असते. त्याने ठरवलं असतं की, हीरोने जिंकायचं. त्यामुळे शेवटी तो जिंकतो. क्रिकेट मॅचचं तसं नसतं. मॅचचा निकाल नियती खेळाडूंच्या कर्माप्रमाणे लिहिते. तिने आधीच उत्तर दिलेलं नसतं. त्यामुळे आपण लढलो, पण हरलो. पण त्यामुळे पुन्हा एक गोष्ट सिद्ध झाली की ढगाळ वातावरणात, चांगल्या स्विंगसमोर आणि थोड्या बाउन्ससमोर हिंदुस्थानी संघ ढेपाळतो. टी-20 क्रिकेटने कसोटीच्या फॉरमॅटसाठी हिंदुस्थानी संघावर जसे चांगले संस्कार केले त्याचप्रमाणे चुकीचेसुद्धा केले.

विशेषतः अशी गोलंदाजी खेळताना हिंदुस्थानी फलंदाजांचं तंत्र उघडं पडतं आणि टी-20च्या सवयीसुद्धा चव्हाट्यावर येतात. प्रत्येक फलंदाज हा गावस्कर, सचिन किंवा द्रविड यांचं तंत्र घेऊन जन्माला येत नाही किंवा तो त्यांच्याशी बरोबरीसुद्धा करू शकत नाही. पण फॉरमॅट कुठलाही असो, मूलभूत गोष्टी बदलत नाहीत. कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना चांगल्या फलंदाजीसाठी डोकं स्थिर लागतं. चेंडूच्या जास्त जवळ जाऊन खेळावं लागतं आणि शक्यतो साईडऑन पद्धतीने फलंदाजी करावी लागते. मग चुका कमी होतात. टी-20 मध्ये काही वेळा ऑफस्टंपच्या बाहेरच्या दुरून जाणाऱ्या चेंडूला फ्लाईंग किस दिला तर चालण्यासारखं असतं. कारण स्लिप नसतात. एखादी कटोरी लागली तर चार धावा मिळू शकतात. किंवा लेंग्थ बॉल हा टी-20त मारण्याचा बॉल ठरतो.

कसोटीत या गोष्टी जास्त करायच्या नसतात. पण बऱ्याचदा असं होतं की, अंगातल्या कपड्यांचा रंग बदलला, रंगीतचा पांढरा झाला तरी मन बदलत नाही. सवय बदलत नाही. पटकन चुका होऊन जातात. पहिल्या डावात नेमकं तेच झालं. दुसऱ्या डावात मात्र हिंदुस्थानी फलंदाजांनी आपल्या कपड्यांचा रंग लक्षात ठेवला आणि त्याप्रमाणे तंत्रात अ‍ॅडजस्टमेंट करण्याचा प्रयत्न केला; पण तोपर्यंत उशीर झाला होता. न्यूझीलंडने पहिल्या डावात साडेतीनशेच्या वर आघाडी घेतली होती. आणि मग तिथून आपल्याला पुढे जायचं होतं आणि आघाडी घ्यायची होती. एकेकाळी असं म्हटलं जायचं की, हिंदुस्थानी संघ त्यांचा दुसरा डाव आधी का खेळत नाही?

कारण बऱ्याचदा असं व्हायचं की, हिंदुस्थानी संघ पहिल्या डावात कोसळायचा आणि मग दुसऱ्या डावात सावरण्याचा प्रयत्न करायचा. पण तो प्रयत्न हा सामना वाचवण्यासाठी असायचा. सामना जिंकण्यासाठी नाही. तेव्हा दिवस दिवस फलंदाजी केली जायची. त्यावेळी ते टेम्परामेंट हिंदुस्थानी संघाकडे होतं. आज हिंदुस्थानी संघ लांच्छनास्पद अशा 46 धावांत कोसळला. तरीही दुसऱ्या डावात खेळताना नुसती मॅच वाचवायची नाही, तर मॅच जिंकण्याचा प्रयत्न करायचा हा विचार सातत्याने येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाच्या मनात असतो. ही हिंदुस्थानी संघाची नवी गुणवत्ता आहे. त्यासाठी त्यांची फलंदाजीतली ताकद, आत्मविश्वास आणि अर्थात टी-20 क्रिकेटमधला अ‍ॅप्रोच, फटके मारणं अंगवळणी पडणं या साऱ्या गोष्टी कारणीभूत आहेत.

पहिल्या पाच फलंदाजांनी धावा करून हिंदुस्थानी संघ जिंकू शकतो ही भावना प्रेक्षकांच्याही मनात रुजवली. अर्थात काही चुका या फलंदाजांनी केल्या. उदाहरणार्थ यशस्वी जैसवाल सगळं व्यवस्थित चाललं असताना आणि चेंडूंत आव्हान नसताना विनाकारण क्रीझ सोडून पुढे सरसावला आणि यष्टिचीत झाला. या आततायीपणाची काहीही गरज नव्हती.

रोहित शर्माच्या पहिल्या पन्नास धावा या एखाद्या जर्मन मशीनसारख्या अत्यंत स्मूथ असतात. पन्नाशी ओलांडली की ते मशीन चिनी मशीन व्हायला लागते. कधी बंद पडेल हे सांगता येत नाही. त्याला काहीही कारण पुरतं. पण मॅचने कूस बदलायची शक्यता निर्माण झाली, ज्यावेळी सरफराज खान आणि पंतने एक मोठी भागीदारी केली.

पूर्वीच्या काळी पराभव टाळण्यासाठी केलेल्या भागीदारीला ‘विथ बॅकस् टू द वॉल’ असं म्हटलं जायचं. पण या भागीदारीत बराच काळ न्यूझीलंडच्या पाठी भिंतीला चिकटल्या आहेत असं वाटत होतं. कसोटी क्रिकेटमध्येही फटके मारलेच पाहिजेत. पण तिथे सुरुवातीला किंचित सेटल व्हायची गरज असते. पहिल्या डावात तो प्रयत्न सरफराजने केला नाही. दुसऱ्या डावात मात्र तो स्थिरावला आणि मग प्रचंड प्रतिहल्ला केला.

सरफराजची एक खासियत आहे. फिरकी गोलंदाजीसमोर तो पेंगुळलेल्या डोळ्यांनीही खेळू शकेल. विशेषतः त्याचा स्वीप. लोकल क्रिकेटमध्ये एक गोष्ट जाणवली की, तो छोटे शतक करत नाही. मोठेच शतक त्याच्या नजरेसमोर असते. इथेही त्याने दीडशेची सीमा गाठली. त्याचं जे तंत्र आहे ते ऑस्ट्रेलियात किंवा इंग्लंडमध्ये किती यशस्वी होईल हे सांगता येत नाही. कारण तिथे खेळपट्ट्या, वातावरण वेगळं असतं. पण चांगला फलंदाज बदलत्या वातावरणाशी स्वतःला जुळवून घेतो. तसं जर त्याने जुळवून घेतलं तर त्याचं भवितव्य चांगलं आहे.

पंतची फलंदाजी पाहिली की, त्याला एवढा प्रचंड जीवघेणा अपघात झाला यावर विश्वासच बसत नाही. काही वेळा तो अविश्वसनीय फटके मारतो. त्याचा स्टेडियमबाहेर गेलेला षटकार अख्खी न्यूझीलंडची टीम आवासून पाहत होती. त्याच्या नैसर्गिक खेळामुळे तो अधूनमधून बेदरकारपणे बाद झाल्यासारखा वाटेल; पण त्याचं यशस्वी होणं हे संघाच्या दृष्टीने विजयाच्या जवळ जाणार आहे.

99 वर असताना तो किंचित दबावाखाली आला. न्यूझीलंडच्या कर्णधाराने क्षेत्ररक्षक जवळ आणले, त्याची एकेरी धाव रोखण्यासाठी. आणि ज्या चेंडूवर त्याने कट मारण्याचा प्रयत्न केला, तो चेंडू त्याच्या शरीराच्या इतक्या जवळ होता की तो फटका यशस्वी झालाच नसता. असे फटके स्टंपवर जातात. आणि नेमकं तेच झालं. नव्वदीत बाद होण्याचा सचिन तेंडुलकरचा विक्रम जर कोण मोडू शकतो तर तो पंतच मोडू शकतो. ते दोघे बाद झाल्यानंतर हिंदुस्थानी संघ मोठा लीड घेऊ शकला नाही. त्यामुळे न्यूझीलंडला जिंकण्यासाठी फक्त 107 धावांचीच गरज होती. ती त्यांनी खंबीरपणे पूर्ण केली. हिंदुस्थानच्या या पराभवात सुरुवातीच्या मानहानीतून ज्या पद्धतीने संघ बाहेर आला ते पाहिल्यानंतर हा पराभव मानहानिकारक वाटला नाही. त्या पराभवात थोडीफार शान होती.