देवगडमध्ये रस्ता खचल्याने डंपर पलटी, वाहनाचे नुकसान

राज्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. नुकतीच देवगडमधून एक अपघाताची घटना समोर आली आहे. देवगड तालुक्यातील कुणकेश्वर प्राथमिक शाळा ते कुणकेश्वर मंदिर या व्हीआयपी मार्गावरील रस्ता अचानक खचला होता. यामुळे मार्गावरून चिरे घेऊन जाणारा डंपर पलटी झाल्याची घटना रविवारी सकाळी कुणकेश्वर येथे घडली.

या अपघातात डंपरचे किरकोळ नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. यात्रौत्सव काळात या मार्गावरूनच व्हीआयपी व्यक्तींच्या वाहनांना या मार्गावरून ये जा केली जाते. या मार्गाची दुरुस्ती व्हावी अशी मागणी गेली दोन वर्षे देवस्थान ट्रस्ट,ग्रामपंचायत कुणकेश्वर,ग्रामस्थ यांच्याकडून होत आहे.

प्रसंगी दुरुस्ती करीता मंजूर केलेला निधी अपुरा असल्याने ते काम संबंधित प्रशासनाकडून रेंगाळले आहे अशी माहिती देवस्थान ट्रस्ट उपाध्यक्ष दिनेश धुवाळी यांनी दिली. यात्रा उत्सवापूर्वी या व्हीआयपी मार्गाची दुरुस्ती तात्काळ सुरू करणे आवश्यक आहे. अन्यथा यात्रा उत्सव काळात व्हीआयपी मार्ग बंद होण्याचा धोका निर्माण झाला आहे.