गुजरातमध्ये अडीचशे कोटींचे ड्रग्ज जप्त, अंकलेश्वर औद्योगिक वसाहत बनली ड्रग्जचा अड्डा

गुजरात मॉडेलची देशभरात चर्चा असताना आता ड्रग्जचे माहेरघर म्हणून गुजरात राज्याची ओळख होत आहे. वर्षभरापासून बंदरे आणि औद्योगिक वसाहतीमध्ये अवैध अमली पदार्थ आढळले आहेत. यादरम्यान आठ दिवसांपूर्वी अंकलेश्वर जीआयडीसीमधून 5 हजार कोटी रुपयांचे कोकेन जप्त केल्यानंतर पुन्हा 250 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले.

सुरत आणि भरूच पोलिसांनी संयुक्त धरपकड करत केलेल्या कारवाईत सोमवारी रात्री अंकलेश्वरमधील अवसार एंटरप्रायझेस नावाच्या कारखान्यावर छापा टाकून 250 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले. आठवडाभरात दुसऱ्यांदा अंकलेश्वर जीआयडीसीमधून पुन्हा अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केल्याने जीआयडीसी ड्रग्जचा अड्डा बनली की काय, असा सवाल उपस्थित होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारखान्याच्या व्यवस्थापकासह तिघांना अटक केली आहे. सुरत गुन्हे शाखेने 2 कोटी रुपयांच्या 2100 ग्रॅम एमडी ड्रग्जसह तिघांना अटक केली होती.

अंकलेश्वरच्या अवसार एंटरप्रायझेसमधून हे ड्रग्ज त्यांच्यापर्यंत पोहोचवल्याचे तिघांनी चौकशीत सांगितले होते. यानंतर पोलिसांनी भरूच पोलिसांसह संयुक्त कारवाईत कारखान्यावर छापा टाकला. मात्र कंपनीचा मालक परदेशात राहत असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. कंपनीत केमिकल्सच्या नावाखाली औषधे तयार केली जात होती. 13 ऑक्टोबर रोजी भरूच पोलिसांनी या कारखान्याजवळ असलेल्या अवकार नावाच्या केमिकल कारखान्यातून 5 हजार कोटी रुपयांचे 518 किलो कोकेन जप्त केले होते.

गुजरात पोलिसांचा अमली पदार्थांविरुद्ध लढा; गृह मंत्री हर्ष सिंघवी यांची कबुली

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांचे होमटाऊन असलेल्या गुजरातची आगळीवेगळी ओळख आहे. मात्र औद्योगिक वसाहतीच्या नावाखाली ड्रग्जच्या कारखान्यात वाढ होत असून कच्चा माल समुद्री किनाऱ्यांमार्गे गुजरातमध्ये येत असल्याचे अनेक कारवायांत समोर येत आहे.

यादरम्यान राज्याचे गृह मंत्री हर्ष संघवी म्हणाले की, गुजरात आणि सुरत पोलीस ड्रग्जविरोधातील मोहीम नसून युद्ध लढत आहेत. हा लढा पुढे नेत सुरत पोलिसांच्या गुन्हे शाखेला ड्रग्ज जप्त करण्यात यश आले आहे. सुरत पोलिसांनी ही कारवाई अत्यंत यशस्वीपणे पार पाडली आहे. गृह मंत्र्याच्या या प्रतिक्रियेमुळे त्यांनी एक प्रकारे हे प्रकार सुरूच असल्याची कबुली दिल्याची चर्चा आहे.