मनाचिये गुंती – भीतीवर मात करा

>> डॉ. सुनीलकुमार सरनाईक

सध्या एक प्रकारचा भयगंड समाजमनामध्ये विविध माध्यमांतून जाणीवपूर्वक पसरवला जात आहे. त्यामुळे भय इथले संपत नाहीअशी परिस्थिती निर्माण झाली आहे, पण ही भीती नाही, तर भयगंड असून तो किती

खरं तर शरीराचे आरोग्य म्हणजेच संपत्ती आहे. ही संपत्ती मिळण्याकरिता प्रत्येक माणसाला एकाग्रता जरुरीची असते. स्वास्थ्य म्हणजे तरी काय? ज्याचे चित्त ‘स्व’ मध्येच राहते तो स्वस्थ. भयमुक्त व चिंतामुक्त राहणे हेच मानवी स्वास्थ्यासाठी महत्त्वाचे आहे. आपले चित्त स्वभावत ‘स्व’कडून इतरत्र जात असते. कुठूनही आवाज आला की, आपण तिकडे लक्ष देऊ लागतो. समाजात काही अघटित घडले की, एकाग्रता भंग पावते. एखादे आकर्षक दृश्य समोर आले की, आपली नजर तिथे खिळते. अर्थात या झाल्या शरीराच्या बाहेरच्या गोष्टी. शरीरात कुठे दुखले-खुपले की, आपले लक्ष शरीराच्या त्या-त्या भागाकडे जाते. मनाविरुद्ध काही घडले की, आपण नाराज होतो. काही वेळा आपला अपमान झाला असे वाटते. मग त्याच विचाराने पुनः पुन्हा आपले मन त्रस्त होते. आपले आर्थिक नुकसान झाले किंवा प्रिय व्यक्तीचा वियोग झाला तर भावनेचे उमाळे वारंवार येऊ लागतात. तसेच काही सामाजिक घटनांची स्मृती आपल्याला छळत राहते. या सर्वांमुळे आपले शारीरिक, मानसिक व सामाजिक स्वास्थ्य बिघडते. त्यामुळे आपण अस्वस्थ होतो. आपल्या मनाला नैराश्य येऊ लागते. दोन-तीन वर्षांपूर्वीपासून कोरोनाच्या संकटांमुळे अनेकांचे स्वास्थ्य पूर्णपणे बिघडले असल्याची सार्वत्रिक तक्रार आहे.

जीवनात ज्याला कुठेही रस दिसत नाही, बाह्य जीवनातील रसांचा आस्वाद घेण्याएवढी रसनिष्पत्ती ज्यात होत नाही तो नीरस म्हणजे निराश माणूस. जीभ कोरडी पडली की, चव समजत नाही. जिभेवर जोपर्यंत ओलावा किंवा रस असतो, तोपर्यंतच तोंडाला चव असते आणि मनुष्याला खावेसे वाटते. तसेच जीवनात सर्व अंगांचा रस चाखण्याच्या बाबतीत शरीरात शक्ती असावी लागते व ती रसरूपाने प्रकट व्हावी लागते अन्न खाल्ल्यानंतर त्याचा प्रथम रस होतो आणि अन्नाचे सेवन होत होत अस्थी तयार झाल्या की, पुढे अस्थींमधील मज्जा तयार होतात. हे चक्र शरीरात सतत चालू असते.

सध्याचा काळ हा स्पर्धेचा व धकाधकीचा आहे. जीवनातील अति धावपळीमुळे किंवा अति प्रमाणात बाळगलेल्या इच्छा, आकांक्षा, हाव किंवा वासनांमागे पळण्यात माणसाची शक्ती मोठय़ा प्रमाणात खर्च होते. अर्थात त्यामुळे मनुष्य स्वास्थ्य हरवून बसला आहे. पण गेल्या दोन-तीन वर्षांपासून कोरोनासारख्या साथीनंतर काहींचे पळणेच बंद झाले आहे. त्यामुळे त्यांना काही साध्य करता येत नाही. काही करावेसे न वाटणे, म्हणजे चलनवलनात आलेला अडथळा. “माझी इच्छा नाही, मला काही नको’’ अशा तऱहेची प्रतिक्रिया अलीकडच्या काळात अनेकांच्या बाबतीत पाहायला मिळतात.

आपण नुसतेच बसून वेळ वाया घालवतो आहे या विचारांमुळे बऱयाच लोकांना नैराश्य व औदासीन्य येते. पण लक्षात घ्या की, काहीही न करण्याची एक कला आहे. ती समजून घेणे आवश्यक आहे. म्हणजे पहा, मजा म्हणून, काहीतरी मनाला आवडेल ते करायचे. आपण कामात व्यग्र नाही म्हणून निराश व्हायचे नाही. नैराश्य किंवा औदासीन्याची लक्षणे जाणून घ्यावीत. जीवनातील चढ-उतार सर्वांच्या परिचयाचे असतात. परिस्थितीनुसार कधी आनंदित होणे, कधी दुःखी होणे, कधी चिंतित होणे स्वाभाविकच आहे, पण जगण्यात स्वास्थ्य उरले नाही, स्वतहून काही करण्याची इच्छाच नाही, जीवनात रस उरला नाही असे सतत वाटू लागणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही भावना दीर्घकाळपर्यंत तशीच राहिली किंवा पुनः पुन्हा जाणवू लागली तर ते अधिक हानीकारक आहे. झोप कमी किंवा खूपच जास्त येणे, मन एकाग्र न होणे, जी गोष्ट सहज करता येत असे, ती आता जमेनाशी होणे, छोटय़ा छोटय़ा गोष्टींचा राग येणे, स्वतःवर नियंत्रण ठेवता न येणे, अन्नावरची वासना एकदम उडणे, जगण्याचा कंटाळा येणे, शारीरिक पातळीवर थकवा व मानसिक पातळीवर गोंधळ उडणे, निर्णय घेणे अवघड होणे, असुरक्षित वाटणे, धडाडीने काही करावे अशी इच्छाच न होणे आदी लक्षणे ही केवळ भीतीमुळे निर्माण होतात.

सध्या एक प्रकारचा भयगंड समाजमनामध्ये विविध कारणांमुळे व विविध माध्यमांतून जाणीवपूर्वक पसरवला जात आहे. त्यामुळे ‘भय इथले संपत नाही’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, पण ही भीती नाही, तर भयगंड असून तो किती निरर्थक आहे हे पटवून सांगितले की, मनावरचा ताण हलका होतो आणि मग नैराश्याला पळवून लावणे सहजसोपे होते. भूतकाळातील वाईट घटना किंवा अनुभव विसरून पुढय़ात वाढलेलं वर्तमान किती आनंददायी व सुखप्रद होईल, हे पाहून वर्तमानातील येणारा क्षण उपभोगत आनंद घेतला पाहिजे.

माझ्या परिचयाच्या एका व्यक्तीला मध्यंतरी एका मोठय़ा अपघातामुळे दीर्घकाळ रुग्णालयात रहावे लागले. डॉक्टरांनी त्याला “तुला इथून पुढे चालता येणार नाही,’’ अशी फार मोठी भीती घातली होती. त्यामुळे तो काही काळ नैराश्याच्या गर्तेत सापडला होता. पण त्यानंतर तीन-चार महिन्यांतच स्वतच्या अंतर्मनाच्या ताकदीवर तो पूर्णपणे बरा झाला व सर्व दैनंदिन व्यवहारांत पुन्हा सक्रिय झाला. ही सर्व करामत त्याच्या अंतर्मनाच्या अद्भुत शक्तीने घडवून आणली.

[email protected]

(लेखक मानसशास्त्राचे व लोककलेचे अभ्यासक आहेत.)