>> डॉ. प्रदीप आवटे
साधारणपणे मार्च ते जून या मान्सूनपूर्व काळात उष्णतेच्या लाटा येताना दिसतात. या काळात योग्य आहारविहार व योग्य जीवनशैली जपत आपल्या आरोग्याची काळजी घेतले पाहिजे.
सर्वसाधारणपणे एखाद्या प्रदेशात सलग तीन दिवस नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा वातावरणातील तापमान 3 डिग्री सेल्शियसने जास्त असेल तर त्याला उष्णतेची लाट असे संबोधतात किंवा सलग दोन दिवस एखाद्या भागात तपमान सलग दोन दिवसांसाठी 45 डिग्री सेल्शियसपेक्षा जास्त असेल तर त्या भागात उष्णतेची लाट आली आहे, असे म्हटले जाते.
वातावरणात होणाऱ्या बदलामुळे सध्या पृथ्वीचे तापमान वाढते आहे. भारताच्या उत्तर भागात दरवर्षी 5 ते 6 उष्णतेच्या लाटा येतात. हे प्रमाण मागील काही दिवसांमध्ये वाढताना दिसते आहे. 1992 ते 2015 या काळात भारतात उष्णतेच्या लाटेमुळे 22,562 लोकांनी आपला जीव गमावला आहे. माणसांसोबतच पक्षी, प्राणी, वनस्पती यांची होणारी हानी मोठी आहे. साधारणपणे मार्च ते जून या मान्सूनपूर्व काळात या उष्णतेच्या लाटा येताना दिसतात. वातावरणाचे तापमान 37 डिग्री सेल्सियस असते तोपर्यंत मानवाला त्याचा काही त्रास होत नाही. मात्र त्यानंतर मात्र मानवी शरीर वातावरणातील उष्मा शोषून घेऊ लागते आणि त्याचे विपरीत परिणाम मानवाच्या शरीरावर होऊ लागतात. तापमान आणि आर्द्रता यांचा मिळून होणारा परिणाम अधिक असतो. उदाहरणार्थ प्रत्यक्ष तापमान 34 डिग्री सेल्सियस असेल, पण आर्द्रता 75 टक्के असेल तर तापमान निर्देशांक 49 डिग्री सेल्सियस इतका असतो. म्हणजे व्यक्तीला ते तापमान 49 डिग्री सेल्सियसइतके त्रासदायक ठरते.
उष्णतेच्या लाटेमुळे होणारी जीवितहानी लक्षात घेता उष्णतेमुळे होणारी हानी टाळण्याकरिता हिट अॅक्शन प्लान अर्थात उष्मा प्रतिबंधक कृतियोजना आखणे आवश्यक आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा या भागात उष्णतेचा त्रास विशेष जाणवतो. अहमदाबाद महानगरपलिकेने 2015 साली अशी कृतियोजना अंमलात आणणे सुरू केले. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात नागपूर, चंद्रपूर या महानगरपालिकांनी उष्माप्रतिबंधक कृतियोजना अंमलबजावणी सुरू केली आहे.
जनतेला संभाव्य उष्णतेच्या लाटेची आगाऊ कल्पना देण्यासाठी हवामान खात्याच्या मदतीने एक यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. असे इशारे विविध माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मेसेजपासून टीव्हीपर्यंत अनेक माध्यमे वापरावी लागतात.
उष्णतेच्या लाटेमुळे उष्णतेमुळे होणाऱ्या विकारांसोबतच हृदयरोग किंवा इतर जुनाट आजार, श्वसन संस्थेचे आजार असणाऱ्या व्यक्तींमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढते. श्वसनसंस्थेचे आजार, मधुमेह, किडनीचे आजार, स्ट्रोक आणि मानसिक आजारांमध्ये वाढ होते. उष्णतेच्या लाटेचे मानसिक आरोग्यावरदेखील परिणाम होतात. मानसिक थकवा, आाढमकता वाढणे, आत्महत्येची प्रमाण वाढणे, मूळचे मानसिक आजार बळावणे इत्यादी निदर्शनास येतात.
उष्णतेच्या लाटेचा त्रास कोणत्या व्यक्तींना होण्याची शक्यता अधिक आहे, हे लक्षात घेणेदेखील आवश्यक आहे. उष्मा खाली नमूद केलेल्या व्यक्तींना अधिक त्रासदायक ठरू शकतो – उन्हात बाहेर कष्टाची कामे करणारे लोक, वृध्द लोक आणि लहान मुले, स्थूल लोक, अयोग्य कपडे घातलेले लोक, पुरेशी झोप न झालेले लोक, गरोदर महिला, अनियंत्रित मधुमेह, हृदयरोग असलेले लोक, अपस्मार रुग्ण, दारूचे व्यसन असलेले लोक, काही विशिष्ट औषधे घेत असलेले लोक व fिनराश्रित, घरदार नसलेले गरीब लोक या अतिजोखमीच्या लोकांची उष्णतेच्या लाटेसंदर्भात विशेष काळजी घेतली पाहिजे. उष्णतेमुळे होणारा शारीरिक त्रास मुख्यत्वे किरकोळ स्वरूपाचा किंवा गंभीर स्वरूपाचा त्रास या प्रकारचा असतो. किरकोळ त्रासात उष्णतेमुळे शरीरावर रॅश उमटणे, हातापायाला गोळे येणे, चक्कर येणे अशा स्वरूपाचा असतो तर गंभीर प्रकारात उष्माघाताचा समावेश होतो. यामध्ये व्यक्तीचा मृत्यूदेखील होऊ शकतो.
साधारणपणे उष्णतेमुळे होणारा त्रास आणि त्या अनुषंगाने करावयाची कार्यवाही खाली नमूद करण्यात आलेली आहे. उष्णता विकार, लक्षणे, प्रथमोपचार, सनबर्न, कातडी लालसर होणे, सूज येणे, वेदना, ताप आणि डोकेदुखी.
साधा साबण वापरून आंघोळ करावी, घामास अडथळा करणारा कातडीवरील तेलकटपणा दूर करावा. कातडीवर फोड असतील तर वैद्यकीय सल्ला घ्यावा. उष्णतेमुळे स्नायूंमध्ये गोळे येणे (हिट ा@ढम्पस्), हातापायात गोळे, पोटाच्या स्नायूत मुरडा व खूप घाम येणे. अशावेळी रुग्णाला सावलीत आणि थंड जागी हलवा. दुखऱ्या स्नायूला हलका मसाज द्या. थोडे थोडे पाणी प्यायला द्या. उलटी झाली तर पाणी देऊ नका.
प्रत्येक भागात व शहरात साधेसोपे उपाय करणे गरजेचे आहे. सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे – बसस्टॅण्ड, रेल्वे स्टेशन, बाजारपेठा, धार्मिक ठिकाणी, बँका, पेट्रोल पंप, मुख्य रस्ते. उन्हात लोकांना विश्रांतीसाठी थंड सावलीच्या जागा निर्माण करणे. बागा, धार्मिक ठिकाणे, धर्मशाळा दिवसभर लोकांसाठी खुल्या ठेवणे. कार्यालये, शाळा, महाविद्यालये यांचे कामाच्या वेळा बदलणे. उष्णतेपासून संरक्षण कसे करावे याबाबत लोकांचे प्रबोधन करणे.
उष्णतेपासून बचाव करण्यासाठी काय करावे, काय करू नये हे समाजावून घेणे आवश्यक आहे. पुरेसे पाणी प्या. प्रवासात पाणी सोबत ठेवा. हलक्या वजनाचे, फिकट रंगाचे, सैलसर कपडे वापरा. उन्हात गॉगल, छत्री, पादत्राणे वापरा. उन्हात जाताना टोपी किंवा हॅटखाली ओलसर कपडा ठेवा. पाळीव प्राण्यांना सावलीत, थंड ठिकाणी ठेवा. ओलसर पडदे, पंखा, कुलर यांच्या मदतीने घर थंड ठेवा.
शक्यतो उन्हाच्या वेळेत घराबाहेर जाणे टाळा. कष्टाची कामे उन्हात करू नका. पार्क केलेल्या वाहनात लहान मुलांना ठेवू नका. गडद रंगाचे, तंग कपडे वापरू नका. उन्हाच्या काळात स्वयंपाक करणे टाळा. स्वयंपाकघर हवेशीर ठेवा. मद्य, चहा, कॉफी, सॉफ्ट ड्रिंक्स टाळा. खूप प्रथिनयुक्त अन्न आणि शिळे अन्न खाऊ नका. या वाढत्या उन्हात आपली सावली आपणच जपायला हवी, त्याशिवाय उन्हाशी मुकाबला कसा करणार?
(लेखक महाराष्ट्र आरोग्य सेवेत वरिष्ठ आरोग्य अधिकारी आहेत.)