बंदी असताना भायखळा पुलावर बस घुसली, बॅरिकेड्सला धडक

भायखळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुलावर अवजड वाहने आणि 9 मीटरपेक्षा उंच वाहनांना बंदी असताना ‘बेस्ट’ बस या पुलावर घुसल्याने बॅरिकेड्सवर धडकली. यामुळे सुदैवाने मोठा अपघात घडला नसल्याने प्रवासी सुखरूप आहेत, मात्र धडकेमुळे बसचे नुकसान झाले.

भायखळा पूर्वेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा ब्रिटिशकालीन उड्डाणपूल आहे. मात्र हा पूल धोकादायक बनल्याने वाहतुकीसाठी बंद केला आहे. या पुलावर 1 एप्रिलपासून अवजड वाहनांना बंदी घातली असून 9 मीटरपेक्षा उंच वाहने पुलाखालून वळवण्यात आली आहेत. सांताक्रुझ बस आगारातील बस नंबर (7871) मार्ग क्रमांक 51 ही कुलाबा बस डेपो दरम्यान धावते. गुरुवारी रात्री 8.35 वाजण्याच्या सुमारास भाडेतत्त्वावरील मातेश्वरी कंपनीची ही बस सांताक्रुझ बस आगारातून भायखळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुलाच्या दिशेने निघाली आणि प्रवेशद्वारावरील बॅरिकेड्सला धडकली.

या बसेस वळवल्या

भायखळ्याचा हा पूल बंद करण्यात आल्याने बेस्ट उपक्रमाने बस मार्ग क्र. सी – 1, 4 लि. ए – 5, 6 लि. 7 लि. 8 लि. 9, 11 लि, 15, ए – 19, ए – 21, ए – 25, सी – 51, 67 व 69 या बसेस डाऊन दिशेने पुलाखालून वळवण्यात आल्या असल्याचे ‘बेस्ट’ प्रशासनाकडून सांगण्यात आले.