डबल केसरी चंद्रहार पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश, सांगली जिंकण्याचा निर्धार

डबल केसरी चंद्रहार पाटील यांनी सोमवारी मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांना शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले. पक्ष प्रवेशानंतर चंद्रहार पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना गदा भेट दिली.

”सध्याचे राजकारण बघता आपल्या पक्षातून पळपुटे, नामर्द पळून जातायत व मर्द शिवसेनेत येतायत. शिवसेना ही मर्दाची संघटना आहे. आज डबल महाराष्ट्र केसरी शिवसेनेत आले आहेत. ही गदा आणि मशाल मर्दाच्या हातात शोभतात. गदेसोबत मशाल घेऊन आपल्याला सांगलीतून एक मर्द दिल्लीत पाठवायचा आहे. आता मी सांगलीत येणार आहे. सध्या मी पूर्ण महाराष्ट्रात फिरतोय. आपल्याला गद्दारांना आडवं करायचं आहे. या हुकुमशाही विरोधात लढताना तुमच्यासारखे मर्द तरणेबांड शिवसेनेत आले आहेत. भविष्य तुमच्या हातात आहे. जनता आपल्याकडे आशेने बघतेय. त्यांना कळत नाहीए की कोण आपल्यासाठी लढतंय. हा पक्षप्रवेश बघून आता लोकांना एक आश्वासन मिळेल की आमच्यासाठी लढणारे मर्द आला आहे. चंद्रहार म्हणाले की ते शेतकऱ्यांचे पुत्र आहेत. मला त्यांना सांगायचे आहे की या गदेचे वजन खूप आहे. पण यापेक्षा शेतकऱ्या्ंच्या अपेक्षेचं वजन खूप मोठं आहे. ते आपल्याला पेलायचं आहे. ते तुमच्या मजबूत खांद्याला शोभेल असं आहे. तुम्ही चला पुढे आपण सगळे सोबत आहोत”, असा विश्वास यावेळी उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांना दिला.

बोलून दाखवण्यापेक्षा करून दाखवण्याची सवय – चंद्रहार पाटील

”उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि उपस्थित सांगली जिल्ह्यातील सर्व युवक आज मला मनापासून आभार मानायचे आहेत. एका शेतकऱ्याच्या मुलाला सांगली लोकसभेच्या दृष्टिने जो मानसन्मान दिलात, त्या बद्दल मी खरोखर आभारी आहे. तुम्ही या निमित्ताने महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांच्या मुलांचा सन्मान केला आहे. आज कुस्ती क्षेत्रात काम केल्यामुळे बोलून दाखवण्यापेक्षा करून दाखवण्याची जास्त सवय आहे. मी आज जास्त काही बोलणार नाही. पण एक गोष्ट खात्रीने सांगतो की येत्या लोकसभा निवडणुकीचा सांगली जिल्ह्यातला पहिला निकाल हा असेल, हे वचन देतो. एका शेतकऱ्याच्या मुलाला एवढ्या मोठ्या परिवारात तुम्ही सामील करून घेतलं, त्याबद्दल मी महाराष्ट्रातील तमाम पैलवान, सांगली जिल्हा यांच्या वतीने तुमचे आभार मानतो.