Donald Trump – डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर दुसऱ्यांदा जीवघेणा हल्ला; AK-47 सह संशयित आरोपीला अटक

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक अंतिम टप्प्यात येत आहे. एकीकडे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तर दुसरीकडे उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्यात डिबेट रंगत आहे. चुरशीच्या होत असलेल्या या निवडणुकीकडे अवघ्या जगाचे लक्ष असतानाच पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचे समोर आले आहे. रविवारी दुपारच्या सुमारास फ्लोरिडातील ट्रम्प इंटरनॅशनल गोल्फ कोर्सजवळ ही घटना घडली असून एके-47 या घातक रायफलसह एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.

सिक्रेट सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना स्थानिक वेळेनुसार रात्री दोनच्या सुमारास घडली. फ्लोरिडातील ट्रम्प इंटरनॅशनल गोल्फ कोर्सवर गोल्फ खेळत असताना त्यांच्या जीवघेण्या हल्ल्याचा प्रयत्न झाला. ट्रम्प यांच्यापासून अवघ्या काही मीटर अंतरावर एक व्यक्ती एके-47 रायफल घेऊन उभा असल्याचे आढळले. त्यानंतर जवानांनी हल्ल्याच्या तयारीत असलेल्या व्यक्तीच्या दिशेने गोळ्या झाडल्या. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाला. मात्र त्याला काही तासातच अटक करण्यात आली. त्याची कसून चौकशी सुरू आहे.

डोनाल्ड ट्रम्प हे सुरक्षित असल्याची माहिती सिक्रेट सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, ट्रम्प यांचा मुलगा डोनाल्ड ज्युनियर याने स्थानिक माध्यमांचा हवाला देत याबाबत ट्विट केले आहे. फ्लोरिडातील वेस्ट पाल्म बीचजवळील ट्रम्प गोल्फ कोर्सवर गोळीबार झाला असून झाडीतून एके-47 रायफलसह एकाला अटक करण्यात आली आहे, असे डोनाल्ड ज्युनियरने नमूद केले आहे.

एफबीआयने देखील याबाबत निवेदन जाहीर केले आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. संशयिताकडून एके-47 रायफल आणि एक गोप्रो जप्त करण्यात आला आहे. बंदुकधारी व्यक्ती ट्रम्प यांच्यापासून 300 ते 500 मीटर अंतरावर होता. सिक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी संशयितावर चार गोळ्या चालवल्या. मात्र संशयिताने गोळीबार केल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, सदर व्यक्तीची ओळख पटली असून त्याचे नाव वेस्ले रॉय (वय – 58) असल्याचे वृत्त न्यूयॉर्क टाइम्स आणि फॉक्स न्यूजने दिले आहे. ही घटना घडली तेव्हा ट्रम्प गोल्फ खेळत होते. त्यानंतर त्यांनी सिक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी घेराव घालत क्लबमधील एका इमारतीमध्ये सुरक्षित नेले.

विशेष म्हणजे याआधीही ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. 13 जुलै रोजी पेन्सिल्वेनियामध्ये एका सभेदरम्यान त्यांच्यावर गोळीबार झआला होता. एक गोळी त्यांच्या कानाला स्पर्श करून गेली होती. त्यात ते जखमी झाले होते. 20 वर्षीय थॉमस क्रुक्स याने हा हल्ला केला होता. सिक्रेट सर्व्हिसच्या स्नायपरने त्याला ठार केले होते.