जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या चाव्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या हाती आल्या असून पुन्हा एकदा ट्रम्पकार्ड चालले आहे. राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा तेच विराजमान होणार आहेत. 2016 मध्ये पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर चार वर्षांच्या अंतराने पुन्हा त्यांनी हे पद खेचून आणले. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना डेमोव्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरीस यांनी टफ फाईट दिली. दोघांमध्ये अटीतटीची लढाई होती. दोघांना विजयाची समान संधी असल्याचे अंदाज बांधले जात होते. मात्र, राष्ट्राध्यक्षपदासाठी कमला हॅरीस यांच्याच नावाची जगभरात चर्चा होती. हिंदुस्थानात हॅरीस यांच्या गावी त्यांच्या विजयासाठी प्रार्थना करण्यात आल्या. अखेर आज भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ट्रम्प यांना विजयी घोषित करण्यात आले.
बहुमतासाठी 270 जागांची आवश्यकता असताना 78 वर्षीय ट्रम्प यांनी 277 जागा जिंकल्या आणि ऐतिहासिक विजय मिळवला. तर कमला हॅरीस यांना 224 जागांवर मजल मारता आली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पाच राज्यांमध्ये ट्रम्प आघाडीवर दिसले. चुरशीची लढत देऊनही हॅरीस यांचा पराभव झाला. ओहियोमध्ये डेमोव्रॅटिक पक्षाचे सदस्य शेरॉड ब्राऊन यांचा रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार बर्नी मोरेनो यांच्याकडून पराभव झाला. त्याआधी वेस्ट व्हर्जिनियाचे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार जिम जस्टिस यांनी सहज विजय मिळवला. या दोन जागांमुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. विस्कॉन्सिन, पेनसिल्वानिया आणि मिशिगन या ठिकाणी डेमोपॅटिक पक्षाकडून कडवी झुंज दिसली.
अमेरिकेला पुन्हा एकदा महान बनवणार. अमेरिकेतील जनतेसाठी, त्यांच्या कुटुंबासाठी आणि भविष्यासाठी येणाऱया प्रत्येक दिवशी लढत राहीन. जोपर्यंत माझ्या शरीरात श्वास आहे तोपर्यंत मी लढत राहीन. समर्थ, सुरक्षित आणि वैभवशाली अमेरिका घडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आता आपण आपला देश कधीच नव्हता इतका उत्तम बनवणार आहोत. याच दिवसासाठी देवाने माझा जीव वाचवला होता. अमेरिकेच्या इतिहासातील हा सर्वात मोठा विजय आहे.
डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेत सुवर्णयुग अवतरणार- डोनाल्ड ट्रम्प
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाची घोषणा करण्यात आल्यानंतर ट्रम्प यांनी फ्लोरिडातील वेस्ट पाल्म बीच येथे आपल्या समर्थकांना संबोधित करताना या विजयामुळे अमेरिकेत सुवर्णयुग अवतरेल, अशा शब्दांत आपल्या विजयाचे वर्णन केले. अमेरिकेन जनतेने आपल्याला अभूतपूर्व आणि निर्णायक आघाडी दिली असल्याचे ते म्हणाले. अमेरिकेतील जनतेसाठी हा भव्य असा विजय असून यापूर्वी कधीही न पाहिली गेलेली ही सर्वात मोठी राजकीय चळवळ आहे. अमेरिकेतील जनतेसाठी सुवर्णकाळ पुन्हा आणू, असे आश्वासनही ट्रम्प यांनी यावेळी जनतेला दिले. तुमचा 45 वा आणि 47 वा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून येणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. मी तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी आणि भविष्यासाठी प्रत्येक दिवशी लढत राहीन, असेही ट्रम्प म्हणाले. अनेक सुधारणा करणार असून देशाच्या सीमाही सुधारणार, असेही ते म्हणाले.
अमेरिकन संसदेवरही ट्रम्प यांचा ताबा
अमेरिकन संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सिनेट आणि प्रतिनिधीगृहाच्या निवडणुकाही झाल्या. यातही ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाने सिनेट म्हणजे वरिष्ठ सभागृहातही बाजी मारली. त्यांना 93 पैकी 51 जागा मिळाल्या. बहुमतासाठी 50 जागांची गरज होती. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्येही रिपब्लिकन आघाडीवर आहेत. काँग्रेसच्या कनिष्ठ सभागृहात म्हणजेच हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये डेमोव्रॅट्सना 133 जागा मिळाल्या तर रिपब्लिकनला 174 जागा मिळाल्या. यात 435 सदस्य असून त्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा आहे.
जागतिक शांततेसाठी एकत्र काम करू – मोदी
या ऐतिहासिक विजयाबद्दल माझे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांचे हार्दिक अभिनंदन. भारत-अमेरिका व्यापक जागतिक आणि धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी मी उत्सुक आहे. आपल्या लोकांच्या चांगल्या भविष्यासाठी आणि जगात शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी आपण एकत्र काम करूया, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
ट्रम्प यांचे शानदार पुनरागमन – नेतन्याहू
ट्रम्प यांचा विजय म्हणजे त्यांचे शानदार पुनरागमन आहे. हा ऐतिहासिक विजय असून तुमचे व्हाईट हाऊसमध्ये परतणे ही अमेरिकेची आणखी एक सुरुवात आहे. अमेरिका आणि इस्रायलमधील संबंध असेच राहतील, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले आहे.
अमेरिका मजबूत राहील – झेलेन्स्की
ट्रम्प यांचे विजयाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली अमेरिका मजबूत राहील, असे युव्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्दोमीर झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.
आगामी काळात एकत्र काम करू – केर स्टारमन
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ऐतिहासिक विजयाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. आगामी काळात आपण अनेक मुद्दय़ांवर एकत्र काम करू अशी आशा आहे, अशा भावना ब्रिटिश पंतप्रधान रेर स्टारमन यांनी व्यक्त केल्या आहेत.
निवडणुकीत सहा हिंदुस्थानींचा डंका
अमेरिकेने सहा हिंदुस्थानींना स्टेट रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून संधी दिली. यात मराठमोळय़ा श्री ठाणेदार यांचाही समावेश आहे. ते सलग दुसऱयांदा निवडून आले. याआधी अमेरिकेत पाच अमेरिकन-भारतीय वंशाचे उमेदवार सिनेट सदस्य म्हणून निवडून आले होते. आता ही संख्या सहावर गेली आहे. व्हिजनिया आणि संपूर्ण ईस्ट कोस्टमधून निवडून येणारे वकील सुहास सुब्रमण्यम हे त्या भागातील पहिले हिंदुस्थानी अमेरिकन स्टेट रिप्रेंझेटिव्ह ठरले. अमी बेरा, राजा कृष्णमूर्ती, रो खन्ना, प्रमिला जयपाल आणि श्री ठाणेदार यांच्यासह सुब्रमण्यमही निवडून गेल्याने अमेरिकन-भारतीय वंशाच्या सिनेट सदस्यांची संख्या सहा झाली आहे. दरम्यान, ऑरिझोनाच्या पहिल्या काँग्रेसनल डिस्ट्रिक्टमध्ये डॉ. अमिश शाह हे कमी फरकाने आघाडीवर असल्याने प्रतिनिधीगृहात हिंदुस्थानी अमेरिकन लोकांची संख्या सातपर्यंत वाढू शकते.
आम्ही युद्ध घडवणारे नाही, संपवणारे
आम्ही युद्ध घडवणारे नसून युद्ध संपवणारे असल्याचे विधान डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक जिंकल्यानंतर केले. रशिया आणि युव्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध थांबवणार असून आता कुठलेही युद्ध होणार नाही असेही ते म्हणाले. आपल्या चार वर्षांच्या कार्यकाळात कुठलेच युद्ध लढले नाही उलट इसीसला हरवले असेही त्यांनी सांगितले.