ट्रम्प-हॅरिस यांच्या डिबेटकडे जगाच्या नजरा, 10 सप्टेंबरला टीव्ही न्यूज चॅनेलवर आमनेसामने

अमेरिकेत 5 नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. रिपब्लिकन पार्टीकडून डोनाल्ड ट्रम्प हे उमेदवार आहेत, तर डेमोक्रेटिक पार्टीकडून कमला हॅरिस या उमेदवार आहेत. या दोन्ही नेत्यांमध्ये पहिल्यांदाच येत्या 10 सप्टेंबरला डिबेट होणार आहे. या डिबेटकडे अमेरिकेसह संपूर्ण जगाच्या नजरा लागल्या आहेत. याआधी झालेल्या एका डिबेटमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी जो बायडेन यांना घाम फोडला होता. परंतु अमेरिकेतील परिस्थिती आता उलट आहे. कमला हॅरिस यांना अमेरिकेत वाढता पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प हे अस्वस्थ झाले आहेत. डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस हे पुढील आठवडय़ात आमनेसामने येणार आहेत. ही डिबेट दोन्ही नेत्यांसाठी मोठी परीक्षा असणार आहे.

त्या बोलत असताना अडथळा आणणार नाही

डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी पेनसिल्वेनियाच्या हॅरिसबर्ग येथील एका टाऊन हॉलच्या बैठकीला उपस्थिती लावली. या वेळी बोलताना ते म्हणाले की, डिबेटमध्ये माझी प्रतिस्पर्धी कमला हॅरिस यांना मी कोणत्याही प्रकारे अडथळा आणणार नाही. त्यांना मी सलग बोलू देणार आहे. ही बैठक पेनसिल्वेनियामधील सर्वात मोठे शहर फिलाडेल्फिया येथे होणार आहे.