अमुदान कंपनीत महाभयानक स्फोटाची घटना घडल्यानंतर डोंबिवलीच्या निवासी भागातील रासायनिक कारखाने स्थलांतरित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र या निर्णयास ठाम विरोध करत शेकडो कारखानदारांनी आज एमआयडीसीच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. कारखान्यांचे स्थलांतर करण्यासाठी सुरू केलेले सर्वेक्षण व अन्य प्रक्रिया ताबडतोब थांबवा, अशी मागणी करण्यात आली असून कारखानदारांना विश्वासात घ्यावे, अशी विनंती करण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही कारखान्यांचे स्थलांतर होऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा कामा (कल्याण-अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन) संघटनेने घेतला आहे. डोंबिवली एमआयडीसीतील फेज-1 व फेज-2मध्ये अंदाजे साडेसहाशे कारखाने असून त्यात काही केमिकल कंपन्यादेखील आहेत.