जन्मठेप’चा अर्थ ‘संपूर्ण आयुष्यभरासाठी’असा होतो का? -सुप्रीम कोर्टाचा सवाल

 ‘आजन्म कारावास’ या संज्ञेचा अर्थ संपूर्ण आयुष्यभरासाठी असा होतो का? आणि फौजदारी दंड संहितेच्या कलम 432 अन्वये ही शिक्षा कमी अथवा माफ केली जाऊ शकते का याविषयी सर्वोच्च न्यायालय विचार करणार आहे.   तिहार तुरुंगाबाहेर 2006 आणि 2007 मध्ये सापडलेल्या मुंडकेविरहीत तीन मृतदेहांच्या खूनप्रकरणी दोषी ठरल्यानंतर जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या चंद्रकांत झा याने यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर न्या. हृषीकेश रॉय आणि न्या. प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठाने दिल्ली सरकारला नोटीस बजावली आहे. ते म्हणाले की, दिल्ली उच्च न्यायालयाने ठोठावलेला मृत्युदंड रद्द करत मला जन्मठेप देण्यात आली; पण या शिक्षेच्या आदेशात ‘माझ्या आयुष्यभरासाठी जन्मठेप’ असा शब्दप्रयोग आहे. पण अशी शिक्षा दिल्यामुळे एखाद्या व्यक्तीची सुधारण्याची संधी हिरावून घेतली जाते त्यामुळे असा शब्दप्रयोग घटनाबाह्य असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.