अंधेरीतील कामगार रुग्णालय रामभरोसे ना चाचण्या होत, ना शस्त्रक्रिया; विमाधारकांवर खासगी रुग्णालयात जाण्याची वेळ

गरीब कामगारांवर विनामूल्य उपचार व्हावेत म्हणून कामगार विमा रुग्णालये सुरू झाली. परंतु कामगार रुग्णालयांची अवस्था बिकट बनली आहे. अंधेरीतील कामगार रुग्णालय तर रामभरोसे सुरू आहे. तिथे ना निदान चाचण्या होत ना शस्त्रक्रिया. फक्त केसपेपर काढता येतो आणि प्राथमिक तपासणी होते. पुढील उपचारांसाठी कामगारांना महागडय़ा खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहण्याशिवाय जगणेच कठीण झाले आहे.

2018मध्ये अंधेरीच्या कामगार विमा रुग्णालयाला आग लागली होती. त्यानंतर दुरुस्ती व डागडुजीनंतर तब्बल चार वर्षं आठ महिन्यांनी बाह्यरुग्ण  विभागातील सेवा ओपीडी सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. 14 ऑगस्ट 2023 रोजी लाखो रुपये खर्च करून उद्घाटन करण्यात आले. तसेच सहा महिन्यांत आंतररुग्ण विभागसुद्धा सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही प्रशासनाने दिली होती. परंतु एक वर्ष उलटून गेल्यानंतरही अजूनही तेथील परिस्थिती आहे तशीच आहे. याचा परिणाम गरीब कामगारांना भोगावा लागत आहे.

या रुग्णालयातील वैद्यकीय सेवा पाच वर्षांनंतरही पूर्णपणे सुरू झालेली नाही. आजही सीटी स्पॅन, एमआरआय, 2 डी इको आदी निदान चाचण्यांसाठी आणि शस्त्रक्रियांसाठी विमाधारकांना कांदिवलीतील विमा रुग्णालय गाठावे लागते. परंतु तेथील परिस्थितीही म्हणावी तशी ठीक नसल्याने खासगी रुग्णालयाचा मार्ग धरावा लागतो. आग लागण्यापूर्वी या रुग्णालयात ज्या सेवा उपलब्ध होत्या त्या लवकर सुरू होतील, अशी चिन्हे दिसत नाहीत. कर्मचाऱयांचीही गेल्या काही वर्षांत भरती झालेली नाही. त्याचा थेट परिणाम रुग्ण सेवेवर होत आहे.

अंधेरीतील कामगार रुग्णालय पूर्ववत सुरू होण्यासाठी केंद्रीय कामगार मंत्रालय, राज्य सरकार व कर्मचारी विमा महामंडळाच्या अधिकाऱ्यांची वर्षभरापूर्वी बैठक झाली होती. लवकरच रुग्णालय पूर्ववत सुरू करण्याचे आश्वासन त्या बैठकीत देण्यात आले होते. परंतु काहीच प्रगती झालेली दिसत नाही. मिंधे सरकारचे आणि केंद्रीय कामगार मंत्रालयाचे दुर्लक्ष कामगारांच्या जिवावर उठले आहे.

या वर्षीच्या पावसाळ्यात रुग्णालयात गळती होऊन पाणी साचल्याने रुग्णालयातील विद्युत पुरवठा 24 तास ठप्प झाला होता. करोडो रुपये खर्चून जर हीच परिस्थिती असेल तर याला नेमके जबाबदार कोण, असे प्रश्न विमाधारक कामगार विचारत आहेत.

अदानींना जागा देण्यासाठीच रुग्णालय बंद करायचेय

हे रुग्णालय पूर्ववत सुरू होण्यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा केला. केंद्रीय कामगार मंत्री, राज्य सरकार, कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे महासंचालक, विभागीय संचालक हे झोपा काढत आहेत का, असा सवाल कामगार विचारत आहेत. सरकारला ही मोक्याची जागा लाडका उद्योगपती मित्र अदानीला द्यायची असल्यानेच रुग्णालय सुरू केले जात नाही, असा गंभीर आरोप कॉंग्रेसचे सरचिटणीस राजेश शर्मा यांनी केला आहे.