मनाचिये गुंती – अंतर्मनाची अद्भुत शक्ती

>> डॉ. सुनीलकुमार सरनाईक

आपले अंतर्मन समर्थ व सशक्त असेल तर जीवनातील अनेक संकटांना आपण स्वत धैर्याने परतवून लावू शकतो. अंतर्मनाची ही शक्ती म्हणजे आपली खरी मानसिक संपदा.

मानवी शरीराचा अभ्यास करताना शारीरिक व मानसिक या दोन्ही शक्तींचा किंवा संपदेचा विचार केला पाहिजे. आपण कित्येक वेळा व्यक्तीच्या शारीरिक संपदेचा विचार करतो. पण मानसिक संपदेचा आपणास विसर पडतो. माणसाचे मन ही एक अद्भुत गोष्ट आहे. आपल्या या अविभाज्य भागाविषयी क्वचितच आपण गंभीरपणे विचार करतो. आपले स्वतचेच नियंत्रण असू शकेल अशी एकमेव गोष्ट आपल्याकडे असते तर ते आहे आपले मन. आपल्या मर्जीविरुद्ध इतर कोणीही त्यावर नियंत्रण ठेऊ शकत नाही. तसेच व्यक्तीच्या सर्वच व्यवहारांवर कुणाचे नियंत्रण असेल तर ते त्याच्या स्वतच्या मनाचेच असते. आपल्या मनात नसेल तर आपण कुठलीच गोष्ट करत नाही. जेव्हा इतरांच्या इच्छेसाठी किंवा कायदे, नियम, नैतिक बंधने वगैरे पाळण्यासाठी आपण काम करतो, मनाची तयारी नसली तरी परिस्थितीशी मिळतेजुळते घेण्याच्या मनाच्या तयारीमुळेच ते काम आपण करतो. जेव्हा शंभर टक्के मनाची तयारी नसते तेव्हा कितीही दबाव आला तरी आपण ते काम करत नाही आणि त्यामुळे होणारे परिणाम सहन करण्यास आपण तयार असतो. बऱ्याच वेळा आपल्या मनात एखादी गोष्ट करावी असे असते. मात्र हातून काहीच होत नाही. अशा वेळीही खऱ्या अर्थाने ती गोष्ट करण्याची मनातून तीव्र भावना नसते. निव्वळ तसे करावे असे वाटत असते. ते झालेच पाहिजे असा अट्टहास नसतो. त्यामुळे असे घडते. जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट तीव्रतेने कराविशी वाटते तेव्हा आपण प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ती गोष्ट करतो. याचाच अर्थ असा की, निरनिराळ्या कृती करण्यास किंवा न करण्यास आपले मनच आपल्याला उद्युक्त करत असते.

आपले सर्व शारीरिक, मानसिक, भावनिक आणि बौद्धिक व्यवहार मनाच्याच नियंत्रणाखाली होत असतात. मनाची तयारी नसेल तर शक्तीचा पुरवठा अवयवांना होत नाही. भीतीने गाळण उडते तीसुद्धा मानसिक प्रतिक्रिया असते, पण त्याच वेळी हातपाय गळणे, घाम फुटणे या क्रिया होतात आणि शरीरातील शक्तीच नाहीशी झाल्यासारखे होते. दुसरे उदाहरण म्हणजे ज्युडो कराटे या खेळाचे घेऊया. ज्युडो कराटेमध्ये विटा फोडणे किंवा फळी फोडण्याचे प्रात्यक्षिक दाखविले जाते. हाताच्या एका रट्टय़ात 5 ते 6 विटांचे तुकडे तुकडे करणे किंवा दीड इंच लाकडी फळीची लाथेने क्षणात तुकडे तुकडे करणे. हे कसे शक्य होते? कराटे खेळणाऱ्या किरकोळ शरीरयष्टीच्या त्या खेळाडूच्या हातात ही अद्भुत शक्ती येते कुठून? ही अचाट शक्ती आपले मन हाताच्या ज्या भागाने विटा फोडायच्या किंवा ज्या लाथेने फळ्या फोडायच्या त्याच्यावर एकाग्र करते. त्यामुळे शारीरिक शक्तीला मानसिक शक्तीची साथ मिळते आणि हात व पाय हातोड्यापेक्षाही मजबूत होतात.

आपले मन दोन भागांत विभागलेले आहे. एक भाग आहे बहिर्मनाचा आणि दुसरा भाग आहे अंतर्मनाचा. हिमनग जसा पाण्यावर तरंगताना त्यांचा 1/10 भाग पाण्यावर आणि 9/10 भाग पाण्याखाली असतो. तद्वतच आपल्या मनाचा 1/10 भाग बहिर्मनाचा आणि 9/10 भाग अंतर्मनाचा असतो. आपल्या शरीरातील हृदयाच्या रक्ताभिसरणाच्या, पंचनेंद्रियाच्या, श्वसनेंद्रियाच्या आणि मेंदूच्या क्रिया अंतर्मनाच्या नियंत्रणाखाली अविरत चालत असतात, तर आपले बहिर्मन पंचनेंद्रियामार्फत माहिती मिळविणे, ती मेंदूकडे पाठविणे, मेंदूकडून आलेल्या संदेशानुसार अवयवांकडून कामे करून घेणे, हे विचार करणे, निर्णय घेणे, कल्पना करणे अशी कामे करत असते. पण ही दोन्ही मने पूर्णपणे स्वतंत्र नाहीत. अंतर्मन आणि बहिर्मन परस्परांशी संबंधित आहेत. बहिर्मनात जे तरंग उठतात, त्यामार्फत जो विचार केला जातो, जे निर्णय घेतले जातात त्या सर्वांच्या नोंदी अंतर्मनात होत असतात. बहिर्मन कृती करण्यापूर्वी कारणमीमांसा करते, पण अंतर्मन ते करत नाही.

कित्येक वेळा अंतर्मन बहिर्मनाला नकळत सूचना देऊन त्याच्याकडून काम करून घेत असते. याबाबत एक उदाहरण घेऊ या. आपण कधीतरी पूर्वी पोहायला शिकलेले असतो. पण बऱ्याच वर्षांत पोहणे झालेले नसते आणि अचानक एक दिवस आपल्याला पोहायची संधी मिळते. प्रथम मनात थोडी शंका असते, पण धाडस करून आपण स्वतला पाण्यात झोकून देतो आणि स्वतच चकित होतो. कारण इतक्या दिवसांनीही आपण सफाईने पोहू लागतो. हे कसे घडते? आता आणखी एक उदाहरण पहा, आपण जेव्हा सायकल शिकतो तेव्हा बॅलन्स सांभाळणे, ब्रेक लावणे, पॅडल मारणे वगैरे सर्व गोष्टी लक्ष देऊन करतो. पण एकदा सायकल चालवायला यायला लागल्यानंतर मात्र इकडे-तिकडे पाहत, मित्रांशी गप्पा मारत आपण आरामात सायकल चालवू लागतो. मध्येच कुणी आले तर बहिर्मनाने काही सूचना देण्याअगोदरच आपल्या हाताने ब्रेक दाबून सायकल जागच्या जागी थांबवलेली असते. हे कसे घडते? हे सर्व अशामुळेच घडते की बहिर्मन जो विचार करतो, निर्णय घेतो, कृती ठरवितो, शरीराकडून करून घेतो या सर्व घटनांची नोंद त्या वेळी आपले अंतर्मन आपल्या नकळत करत असते आणि जेव्हा त्या सूचनांची गरज पडते तेव्हा योग्य त्या सूचना देत अंतर्मन काम करून घेते.

आपले अंतर्मन समर्थ व सशक्त असेल तर जीवनातील अनेक संकटांना आपण स्वत धैर्याने परतवून लावू शकतो. याचे अगदी माझ्या जवळचे उदाहरण द्यायचे झाले तर माझे एक स्नेही चित्रकार, शिल्पकार, छायाचित्रकार व शिवशाहीर आहेत. त्यांना 1999 साली व 2007 साली असे दोन वेळा पॅरेलेसिसचे दोन अ‍ॅटॅक येऊन गेले. दुसरा एखादा असता तर नक्कीच गर्भगळीत झाला असता किंवा अंथरुणाला खिळून पडला असता, पण या स्नेह्याने केवळ आपल्या मनशक्तीच्या जोरावर या जीवघेण्या आजारावर मात करून पहिल्यासारखा कार्यरत झाला आहे.

माझ्या दुसऱ्या एका मित्राला 2010 साली अचानक हार्टअ‍ॅटॅक आला. त्याला तातडीने दवाखान्यात दाखल केल्यावर त्याची बायपास सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. या मित्राने त्या गोष्टीला स्पष्टपणे नकार देत स्वतच्या जबाबदारीवर दवाखान्यातून डिस्चार्ज घेतला. डॉक्टरांनी त्याच्या घरच्या लोकांना खूप भीती घातली, पण या मित्राचा हट्टी स्वभाव घरचे लोक जाणून होते. त्याने स्वतच्या दैनंदिन आहारामध्ये व विहारामध्ये बदल करून आज सुमारे दहा वर्षे झाली तो पूर्णपणे निरोगी आहे. त्याने स्वतच्या अंतर्मनाच्या शक्तीला साद घालून अशा जीवघेण्या संकटातून स्वतला बाहेर काढले आहे. याचाच अर्थ आपल्या अंतर्मनाच्या अद्भुत शक्तीचा वापर केला तर जीवनातील कित्येक संकटांना आपण पिटाळून लावू शकतो.

[email protected]

(लेखक मानसशास्त्र व लोककलेचे अभ्यासक आहेत.)