खेळता खेळता घड्याळ्याचा सेलच गिळला, डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करत दिले चिमुकल्याला जीवनदान

लहान मुलं कधी काय करतील याचा नेम नाही. चिमुकल्यांचे नको ते उद्योग कधी कधी जीवावर बेततात. अशीच एक घटना राजस्थानमधील कोटा येथे उघडकीस आली आहे. एका सहा वर्षाच्या मुलाने खेळता खेळता घड्याळाचा सेल तोंडात टाकला आणि गिळला. त्यानंतर मुलाला श्वास घ्यायला त्रास होत असल्याने रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करत मुलाला जीवनदान दिले.

काय घडलं नेमकं?

कोटामध्ये एका सहा वर्षीय मुलाने खेळताना घड्याळ्याचा लहानसा सेल तोंडात टाकला आणि गिळला. सेल गिळल्यानंतर सेल चिमुकल्याच्या श्वासनलिकेतून फुफ्फुसात जाऊन अडकला. यानंतर मुलाला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. पालकांनी मुलाला तात्काळ रुग्णालयात नेले.

डॉक्टरांनी मुलाचा एक्स रे आणि सीटी स्कॅन काढला. यात फुफ्फुसात 1 बाय 1 चा सेल अडकल्याचं दिसलं. यानंतर डॉक्टरांनी सर्व आवश्यक तपासण्या करत शुक्रवारी मुलाची सर्जरी केली. सर्जरीनंतर मुलाच्या फुफ्फुसातील सेल बाहेर काढत डॉक्टरांनी त्याला जीवनदान दिले.