तुमचे पापी हात महाराजांच्या पुतळय़ाला लावू नका! संजय राऊत यांचा इशारा

भ्रष्टाचारी ठाणेकर मिंध्यांनी शिवसेनेशी गद्दारी करून जसे झटपट सरकार स्थापन केले तसेच निवडणुका डोळय़ांसमोर ठेवून प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणून घाईगडबडीत राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला. मात्र पुतळा उभारण्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्यामुळे फक्त आठ महिन्यांतच हा पुतळा कोसळला. त्यामुळे आता तुमचे पापी हात महाराजांच्या पुतळय़ाला लावू नका, असा इशारा देतानाच अडीच महिन्यांत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होईल. त्यावेळी शिवसेनाच हा पुतळा उभारेल, असे शिवसेना नेते-खासदार संजय राऊत राऊत म्हणाले.

खासदार संजय राऊत यांनी आज मालवण राजकोट येथे पुतळा कोसळलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. लातूर भूकंपानंतर इतका मोठा आघात महाराष्ट्राच्या समाजमनावर झाला असून घराघरातून सरकारच्या बेजबाबदारपणाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत असल्याचे ते यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले. जपानमध्ये ताशी 200 किमीपेक्षा जास्त वेगाने वारे वाहतात. त्या ठिकाणी पुतळे कोसळत नाहीत. मात्र ठाणेकर मुख्यमंत्री म्हणतात, ताशी 45 किमी वेगाने वारे वाहत असल्यामुळे पुतळा कोसळला. महाराष्ट्रात अशी असंख्य वादळे, संकटे येऊन गेली. मात्र अशी दुर्घटना घडली नाही. राजकोटजवळील नारळी, पोफळीची झाडे कोसळली नाहीत, मात्र शिवरायांचा पुतळा कोसळला. मिंध्यांनी याचे खापर नौदलाच्या माथी फोडले. पुतळय़ाच्या आजूबाजूची शेड शाबूत असताना शिवरायांचा पुतळा कोसळल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, सतीश सावंत, अतुल रावराणे, भाई गोवेकर, संजय पडते आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्याचे गृहमंत्री दुबळे

सिंधुदुर्गात राजकीय कार्यकर्ते, शिवसैनिक, पत्रकारांचे खून झाले, मात्र त्यांचा छडा लागला नाही. गृहमंत्री फडणवीसांच्या काळात पोलिसांवरही हल्ले होताहेत. सिंधुदुर्गात पोलिसांना धमक्या दिल्या जाताहेत. मात्र गृहमंत्री काहीही करीत नाहीत. राज्याचे गृहमंत्री दुबळे असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

तर समुद्रमार्गे अतिरेकी घुसतील

जे. जे. स्पूल ऑफ आर्टच्या सांस्पृतिक मंडळाची सहा फुटांपेक्षा जास्त परवानगी नसताना अवाढव्य पुतळा बेकायदेशीरपणे उभारण्यात आल्याचे राऊत म्हणाले. या दुर्घटनेत बरेच गुन्हेगार आहेत. त्यांचा अद्याप शोध घेतलेला नाही. कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे या सरकारवर भरवसा ठेवता येणार नसून समुद्रमार्गे अतिरेकीही घुसतील, अशी भीतीही राऊत यांनी व्यक्त केली.