एकही कुणबी नोंद रद्द कराल तर गाठ मराठ्यांशी आहे! मनोज जरांगे यांचा सरकारला स्पष्ट इशारा

ओबीसी नेत्यांच्या सांगण्यावरून एकही कुणबी नोंद रद्द कराल तर याद राखा गाठ मराठ्यांशी आहे, असा स्पष्ट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला. मराठा आरक्षणाला आडकाठी आणणार्‍या छगन भुजबळांची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा निर्धार त्यांनी पुन्हा बोलून दाखवला.

ओबीसी उपोषणकर्त्यांना भेटल्यानंतर बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्यावर पलटवार करताना जरांगे यांनी कुणबी नोंदी बोगस कशा ठरवता असा सवाल केला. ओबीसी नेत्यांच्या सांगण्यावरून एकही नोंद रद्द केली तर सरकारला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील असा इशारा त्यांनी दिला. मराठा आरक्षणाला अपशकुन करणारे छगन भुजबळ यांची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करणार असेही जरांगे म्हणाले.

अगोदर मराठा आणि ओबीसी आणि आता मराठा धनगरांमध्ये वाद निर्माण करण्यात येत असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला. छगन भुजबळ हे घटनात्मक पदावर आहेत तरीही ते दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. भुजबळांनी कितीही ओबीसींना एकत्र आणले तरी त्याच्यासारख्या माणसाला कोणतेही उत्तर देऊ नका असे आवाहन जरांगे यांनी मराठा समाजाला केले. आम्ही कुणाचेही आरक्षण ओरबाडत नसून आमच्या हक्काचे मागत आहोत असेही त्यांनी सुनावले. सरकार जर ओबीसी नेत्यांच्या दबावाला बळी पडून काही निर्णय घेत असेल तर आम्हाला पुन्हा एकदा मराठ्यांची ताकद दाखवावी लागेल असेही ते म्हणाले.

वेळ पडली तर समाजासाठी बलिदान देणार!
समाज माझी पाठराखण करायला खंबीर आहे. मी समाजाच्या कोट्यवधी लेकरांसाठी लढतो आहे. वेळ पडली तर समाजासाठी बलिदान देईल मात्र घाबरून समाजावर अन्याय होऊ देणार नाही. मराठा समाज एकत्र आला त्याचे मतात रूपांतर झाले. यामुळे यांचे पोट दुखत आहे, अशी टीकाही मनोज जरांगे यांनी केली.