स्वप्न अपूर्ण राहिलं! पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

राज्यात उद्यापासून पोलीस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळेच उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीवाच राण करुन राज्यातील तरुण-तरुणी पोलीस भरतीची तयारी करत आहेत. परंतू या सर्व घडामोडींमध्ये मनाला चटका लावणारी दुर्देवी घटना नांदेड जिल्ह्यातील मुदखेडमध्ये घडली आहे. नांदेडमध्ये पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

राज्यात पोलीस शिपाई पदासाठी उद्यापासून भरती प्रक्रीया सुरू होणार आहे. त्यामुळेच तरुण-तरुणी प्रचंड मेहनत घेत आहेत. नांदेडमधील मुदखेड शहरातील ज्ञानेश्वर माणिका संबोड हा सुद्धा पोलीस भरतीची जय्यत तयारी करत होता. रोज सकाळी तो धावण्याचा सराव करत होता. नेहमीप्रमाणेच तो आज (18 जून) सरावासाठी गेला होता. परंतू सकाळी साडेसहा च्या सुमारास धावत असतानाच त्याला ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.  ज्ञानेश्वर हा शेतकरी कुटुंबातील असून पोलीस होण्याचे त्याचे स्वप्न होते. त्यामुळेच तो कसून मेहनत करत होता. त्याच्या पश्चात आई आणि भाऊ असा परिवार असून ज्ञानेश्वरच्या अचानक जाण्यामुळे त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.