Lok Sabha Election 2024 चा सातवा आणि अंतिम टप्पा 1 जून रोजी पडणार आहे आणि 4 जून म्हणजेच निकालाच्या दिवसाची उत्सुकता साऱ्यांनाच लागली आहे. मात्र अद्यापही राजकीय आरोप-प्रत्यारोप कायम सुरू आहेत. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी गुरुवारी राजकीय विरोधकांवर गंभीर आरोप केले आहेत. शिवकुमार यांनी सांगितलं की, राजकीय विरोधक त्यांच्या आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात केरळमधील एका मंदिरात ‘अघोरी’ आणि ‘तांत्रिक’ यांच्या माध्यमातून काळी जादू करत आहेत. कर्नाटकातील काँग्रेस सरकार अस्थिर करण्यासंदर्भात हे प्रयत्न असल्याचंही ते म्हणाले.
पत्रकारांशी बोलताना शिवकुमार म्हणाले की, त्यांच्याकडे अत्यंत विश्वासार्ह माहिती आहे की केरळमधील राजराजेश्वरी मंदिराजवळ एका निर्जन ठिकाणी ‘अघोरी’ द्वारे यज्ञ म्हणजे विशेष पूजा केली जात आहे. ‘काँग्रेसचे सरकार अस्थिर करण्यासाठी माझ्यावर, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हा विधी सुरू आहे’, असंही ते म्हणाले.
यज्ञाचा मुख्य उद्देश शत्रूंचा नायनाट करणे हा असून या विधीला ‘राजा कंटक’ आणि ‘मरण मोहना स्तंभ’ यज्ञ म्हणतात. विधीत सहभागी झालेल्यांनीच याची माहिती दिल्याचा खुलासाही शिवकुमार यांनी केला आहे.
अघोरींच्या माध्यमातून 21 लाल बकऱ्या, तीन म्हशी, 21 काळ्या मेंढ्या, पाच डुकरांचा बळी काळ्या जादूसाठी दिला जात असल्याचं त्यांनी सांगितलं.
हा विधी भाजप किंवा जेडीएसचे नेते करत आहेत का, असे विचारले असता शिवकुमार यांनी कर्नाटकातील राजकारणी जबाबदार असल्याचं सांगितलं. ‘मला माहित आहे की हा विधी कोण करत आहे. त्यांना त्यांचे प्रयत्न सुरू ठेवू द्या; मला त्रास होत नाही. ते त्यांच्या विश्वास प्रणालीवर सोडले जाते. त्यांनी मला कितीही हानी पोहोचवण्याचे प्रयत्न आणि प्रयोग करूनही, मी ज्या शक्तीवर विश्वास ठेवतो ते माझे रक्षण करेल’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या विधीच्या उलट पूजा करणार का असा प्रश्नला शिवकुमार यांनी स्पष्ट उत्तर दिलं. ते म्हणाले, ‘मी कामावर जाण्यापूर्वी दररोज एक मिनिट देवाला प्रार्थना करतो’.
असा विधी करणाऱ्या व्यक्तींची नावं जाहीर करा, असा आग्रह पत्रकारांकडून सुरू होता. त्यावेळी शिवकुमार यांनी मीडियानंच याची चौकशी करावी असं सुचवलं.
शिवकुमार पुढे म्हणाले की, ‘मला याची काळजी का वाटेल? हा त्यांचा प्रयत्न आहे. हा त्यांचा विश्वास आहे. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी आम्ही ज्या शक्तींवर विश्वास ठेवतो ते आमचे रक्षण करतील’.
शिवकुमार यांनी जाहीर केलं की 2 जून रोजी बेंगळुरूमध्ये आमदारांची बैठक होणार आहे. सर्व आमदार, आमदार आणि खासदारांना आमंत्रित केलं जाईल. या बैठकीत पक्ष आणि एमएलसी निवडणुकीवर चर्चा होईल, असंही ते म्हणाले.