यंदाच्या दिवाळीत सोने खरेदीचा प्रचंड उत्साह असून भाऊबीजेपर्यंत तब्बल दोन हजार कोटींची उलाढाल होईल, असा अंदाज सराफा बाजारात व्यक्त होत आहे. गेल्या शनिवारपासून खऱ्या अर्थाने दिवाळी सुरू झाली असून या आठवडाभरात तब्बल 200 ते 250 टन संपेल, अशी माहिती सराफा बाजारातील व्यावसायिकांनी दिली. 24 कॅरेट सोन्याचा दर 80 हजारांवर गेलेला असला तरी ग्राहकांच्या सोने खरेदीवर अक्षरशः उडय़ा पडत असल्याचे ते म्हणाले. यंदा सराफा बाजारात सोने खरेदीचा उत्साह मोठा असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या सराफा बाजारात 30 ते 50 वयोगटातील तरुणांसह ज्येष्ठांचीही मोठी संख्या दिसत आहे. सोने खरेदीसोबतच चांदी आणि हिरे खरेदीची उलाढालही दोन ते अडीच हजार कोटींपर्यंत जाईल, असे सराफा बाजारातील व्यावासायिकांनी म्हटले आहे. विशेषतः जुने सोने देत नवीन सोने खरेदीचाही उत्साह मोठा असून सोन्याची नाणी खरेदी करण्यासोबतच हलक्या वजनाचे दागिने खरेदी करण्यावर ग्राहकांचा भर असल्याचे चित्र सराफा बाजारात आहे.
45 लाखांहून अधिक गाडय़ांची विक्री
वाहन खरेदीचाही मोठा उत्साह असून भाऊबीजेपर्यंत 45 लाखांहून अधिक गाडय़ांची विक्री होईल. असा अंदाज ‘फाडा’ अर्थात ‘फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन’चे उपाध्यक्ष साई गिरधर यांनी व्यक्त केला. गाडय़ांमागे मोठय़ा प्रमाणावर दिवाळीनिमित्त सवलत दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले. यंदा दसऱयापासूनच वाहन खरेदीचा उत्साह मोठा असून दिवाळीनंतर पुन्हा डिसेंबरमध्ये वाहन खरेदीचा आकडा वाढेल, अशी माहिती ठाण्यातील मोदी ह्युंदाईच्या टीम लीडर सोनाली मते यांनी दिली. इलेक्ट्रिक वाहनांनाही मोठी मागणी असून गेल्या वर्षी 37.93 लाख वाहनांची विक्री झाली होती. त्या तुलनेत यंदा 45 लाखांहून अधिक वाहनांची विक्री होईल, असे ते म्हणाले.
लग्नसराईसाठीही मोठी खरेदी
दिवाळीच्या दिवसांमध्ये मोठय़ा प्रमाणावर सोने खरेदी झाल्याचे जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सचे संचालक डॉ. आनंद जगन्नाथ पेडणेकर यांनी सांगितले. लग्नसराईचा मोसम असल्याने नेकलेस. मंगळसूत्र, बांगडय़ा, अंगठय़ांसोबतच आम्रपाली, रेवतीसारखी हटके कलेक्शन्स खरेदीवर ग्राहकांचा भर असल्याचे त्यांनी सांगितले.
भाऊबीजेपर्यंत तेजी
भाऊबीजेपर्यंत सराफा बाजारात मोठय़ा प्रमाणावर सोने खरेदी होईल. रोज तब्बल 200 कोटी रुपयांची उलाढाल होईल, अशी माहिती मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष कुमार जैन यांनी दिली. आठ ग्रॅम सोन्यामागे आठ ग्रॅम सोने दिले जात असून रिसायकल सोन्याची मोठय़ा प्रमाणावर खरेदी-विक्री होत असल्याचे त्यांनी सांगितले.