रेल्वेचा ट्रॅक बदलल्याने प्रवासी संतापले, दिवा स्थानकात रेल्वे रोखून धरली

लोकल रेल्वे सेवेला मुंबईची जीवनवाहिनी म्हटलं जातं. कमी वेळेत, कमी आर्थिक मोबदल्यात जास्तीचं अंतर कापता येत असल्यामुळे तमाम मुंबईकरांना लोकल सोयीची पडते. अशात जर रेल्वेचा खोळंबा झाला तर प्रवाशांचे हाल होतात. असाच प्रकार बुधवारी सकाळी दिवा स्थानकात झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी रेल्वे रोखून धरली. या प्रकारानंतर एका महिला प्रवाश्याविरोधात मोटरमनच्या केबिनमध्ये घुसल्याच्या कारणाने तक्रार दाखल करण्यात आली आहे.

बुधवारी सकाळी मध्य रेल्वेच्या दिवा स्थानकात मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेने ट्रॅक बदलल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसला. अचानक असा ट्रॅक बदलल्याने वेळेचा खोळंबा झाल्याच्या संतापात प्रवाशांनी रेल्वे रोखून धरली. अखेर प्रशासनातर्फे त्यांची समजूत काढल्यानंतर प्रवासी शांत झाले. बुधवारी सकाळी कामावर जाण्याच्या गडबडीत असलेले दिव्यातील प्रवासी रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर उभे होते. रोज मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल याच प्लॅटफॉर्मवर येते. मात्र बुधवारी ही लोकल ट्रेन येण्यास काही मिनिटे उशिर झाला. उशिर झालेली ट्रेननंतर दिवा स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर आली. 4वर येणारी लोकल ट्रेन दोनवर आल्याने प्रवाशांची मोठी धांदल उडाली. त्यामुळे संतप्त नागरिकांनी रेल्वे ट्रॅकवर धाव घेतली. ट्रेन समोर उभे राहत प्रवाशांनी संताप व्यक्त केला. तसेच ही लोकल तब्बल 10 ते 15 मिनिटे थांबवून ठेवण्यात आली.

रेल्वे स्थानकात गोंधळ झाल्यानंतर आरपीएफ जवानांसह रेल्वे प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी रेल्वे कर्मचाऱ्यांनी संतप्त नागरिकांची समजूत काढली. त्यानंतर प्रवाशी रेल्वे रुळांवरून बाजूला झाले.