अक्कलकोटमध्ये रेशनवर प्लॅस्टिक तांदळाचे वाटप

अक्कलकोट तालुक्यातील रेशन दुकानामध्ये प्लॅस्टिक तांदूळवाटप करण्यात येत असल्याचा धक्कादायक आरोप सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. त्यांनी प्लॅस्टिक तांदळाचे नमुनेही दाखविल्याने प्रशासनाची भंबेरी उडाली असून, आता होणाऱया कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अक्कलकोट तालुक्यातील रेशन दुकानांमध्ये अत्यंत धोकादायक असलेला प्लॅस्टिकचा तांदूळ रेशनकार्डधारकांना देण्यात येत असल्याचा आरोप सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, अक्कलकोट तालुक्यातील ओरे गावात रेशन दुकानातून वाटप करण्यात आलेले तांदूळ प्लॅस्टिकचे आढळले आहेत. या तांदळाची चव मी पाहिली आहे. त्यामुळे सरकार रेशन कार्डधारकांच्या जीवाशी खेळत आहे. अनेकांच्या रेशन कार्डमधून नावेही गायब करण्यात आली आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

भाजपाच्या आमदारांची फसवेगिरी

n सोलापूर विमानतळाच्या उद्घाटनावरून प्रणिती शिंदे यांनी सोलापुरातील भाजपाच्या आमदारावर फसवेगिरी व दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे सांगत सोलापुरात 1948 पासून सोलापूर विमानतळ आहे. त्यामुळे आमदारांनी उद्घाटनाच्या फसवणुकीचा घाट न घालता विमानसेवा कधी सुरू करणार, हे जाहीर करावे. या विमानतळावर यापूर्वीही देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधानांसह अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या विमानांचे लँडिंग झाले आहे. त्यामुळे भाजपाने विमानतळाबाबत फसवणूक करू नये, असा इशाराही दिला आहे.