राष्ट्रवादीचा आमदार असलेल्या पिंपरीवर मिंधे गटाचा दावा; पिंपरीवरून महायुतीत मिठाचा खडा

राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अण्णा बनसोडे यांच्याविषयी मतदारांमध्ये प्रचंड नाराजी असून, ही जागा आम्हाला मिळावी, अशी मागणी मिंधे गटाने केली आहे. त्यामुळे आमदार बनसोडे यांना उमेदवारीसाठी संघर्ष करावा लागण्याची शक्यता आहे. पिंपरीच्या जागेवरून महायुतीत मिठाचा खडा पडण्याची चर्चाही रंगू लागली आहे.

शहरात पिंपरी, चिंचवड आणि भोसरी असे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये पिंपरी मतदारसंघ हा अनुसूचित जातींसाठी (एससी) राखीव आहे. 2009 च्या पहिल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे, तर 2014 मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार निवडून आले. 2019 मध्ये पुन्हा बनसोडे राष्ट्रवादीकडून निवडून आले. राष्ट्रवादीत झालेल्या फुटीनंतर आमदार बनसोडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राहण्याचा निर्णय घेतला. महायुतीत ‘ज्या पक्षाचा आमदार, त्या पक्षाला जागा’, असे सूत्र ठरल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे बनसोडे यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. मात्र, आता मिंधे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पिंपरीवर दावा सांगितल्याने बनसोडे यांना उमेदवारी मिळविण्यासाठी झगडावे लागणार आहे. तसेच आमदार बनसोडे हे पावणेपाच वर्षे मतदारसंघात सक्रिय नसल्याचे वारंवार बोलले जात असून, याचा फटका त्यांना आगामी निवडणुकीत बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मिंधे गटाचे खासदार बारणे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये अनेक दावेदार आहेत. आमदार बनसोडे यांच्याविषयी प्रचंड नाराजी आहे. महायुतीसाठी प्रत्येक जागा महत्त्वाची आहे. महायुतीचा एक आमदार कमी होऊ नये, यासाठी पिंपरी मतदारसंघ आम्हाला मिळावा. या मतदारसंघातून लोकसभेला निर्णायक मते मिळाली आहेत. या जागेची मागणी करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना सूचित केल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

आमदार अण्णा बनसोडे म्हणाले, की ‘ज्या पक्षाचा विद्यमान आमदार, त्या पक्षाला जागा’, असे महायुतीचे सूत्र ठरले आहे. शिवसेनेने दावा करणे उचित असून, तो त्यांचा अधिकार आहे. परंतु, महायुतीत ठरल्याप्रमाणे जागा राष्ट्रवादीलाच सुटणार असून, मी लढणारच आहे. माझ्याबाबत नाराजी असल्याचे खासदार बारणे यांचे वैयक्तिक मत आहे.

महायुतीत बदला घेण्याचे राजकारण सुरू

लोकसभा निवडणुकीत मिंधे गटाचे श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला सुरुवातीला आमदार अण्णा बनसोडे यांनी कडाडून विरोध | केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची बनसोडे यांनी मागणी केली होती. त्यामुळेच आता खासदार बारणे यांनी बनसोडे यांच्याबद्दल प्रचंड नाराजी असून, ही जागा आम्हालाच मिळावी, असा दावा करून बनसोडे यांना टेन्शन दिले आहे. मात्र, या प्रकारावरून महायुतीत बदला घेण्याचे राजकारण सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.