लिरेनचे पुनरागमन; बाराव्या फेरीत गुकेशला हरविले

गत जगज्जेत्या चीनच्या डिंग लिरेनने 12व्या फेरीत हिंदुस्थानच्या डी. गुकेशला पराभवाचा धक्का देत जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत पुनरागमन केले. आता उभय खेळाडूंच्या खात्यात 6-6 गुणांची बरोबरी झाली असून, केवळ दोन लढती शिल्लक राहिल्याने स्पर्धेची उत्कंठा टिपेला पोहोचली आहे.

लागोपाठच्या सात डावांतील बरोबरीनंतर डी. गुकेशने रविवारी 11व्या फेरीत विजय मिळवत 6-5 अशी आघाडी मिळविली होती. मात्र, लिरेनने 12व्या डावात बाजी मारत पुन्हा बरोबरी साधत आपल्याला गत जगज्जेता का म्हणतात हे दाखवून दिले. जगज्जेते बनण्यासाठी 7.5 गुणांची गरज आहे. म्हणजेच उभय खेळाडू जगज्जेतेपदापासून केवळ 1.5 गुण दूर आहेत. मंगळवारी विश्रांतीचा दिवस असून, बुधवारी व गुरुवारी अखेरच्या दोन लढती रंगणार आहेत.