निवडणूक जिंकल्यावर बहिणीशी नातं तुटलं का? अर्जाच्या छाननीवरून लाडक्या बहिणी संतप्त

लाडकी बहीण योजनेतील अर्जांची छाननी करण्याच्या चर्चेनंतर महिलावर्गात संताप व्यक्त होत आहे. निवडणूक जिंकल्यानंतर सरकारचे बहिणीशी नाते तुटले का, असा सवाल महिलांकडून केला जात आहे. त्यामुळे घाबरलेल्या महायुती सरकारनेच छाननीची केवळ अफवा असल्याची सारवासारव केली आहे.

लाडकी बहीण योजनेत 2 कोटी 34 लाख महिलांनी आतापर्यंत लाभ घेतला आहे. निवडणूक आचारसंहितेमुळे 16 लाख अर्जांची छाननी झाली नव्हती. आता त्या अर्जांची छाननी करून पात्र-अपात्र ठरवले जाणार आहे. मात्र पुन्हा सर्वच अर्जांची छाननी केली जाणार असल्याचे वृत्त पसरले आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये नाराजी व्यक्त होऊ लागली आहे.

महायुती सरकारने सत्तेवर येताच लाडक्या बहिणींच्या मतांचा विजयात मोठा वाटा असल्याचे म्हटले होते. त्या लाडक्या बहिणीच नाराज होत असल्याचे पाहून सरकारकडून सारवासारव सुरू झाली आहे. माजी महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी अर्जांच्या छाननीसंदर्भात कोणत्याही लेखी सूचना किंवा आदेश शासनाने काढलेले नाहीत. अर्जांची छाननी केल्यानंतरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे टाकले गेले आहेत. त्यामुळे सर्वच अर्जांची पुन्हा छाननी होणार या निव्वळ अफवा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

छाननी करावीच लागते…अधिकाऱ्यांची माहिती

महिला व बाल कल्याण विभागातील वरिष्ठ अधिकाऱयांनी मात्र योजनेसाठी आलेल्या अर्जांची छाननी करणे हा प्रक्रियेचा भाग असून कोणत्याही योजनेचा लाभ देण्यापूर्वी अर्जदाराच्या पात्र-अपात्रतेची तपासणी करावीच लागते, अशी माहिती दिली.