पाकिस्तानातील हुकूमशाही हिंदुस्थानात आली का? आदित्य ठाकरे यांचा सवाल, ईडी ही भाजपची शाखा

सरकारच्या विरुद्ध सत्य बोलणाऱयांवर ईडी, सीबीआयकडून एकतर्फी कारवाई केली जात आहे. पाकिस्तानातील हुकूमशाही आपल्या देशात आली आहे का, असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला.

नाशिक येथे बुधवारी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सरकारच्या कारभाराविरुद्ध जो कोणी बोलेल त्याच्यावर केंद्रीय संस्थांकडून कारवाई केली जाते. भाजपा, मिंधे गटातील भ्रष्टाचाऱयांवर कुठलीही कारवाई होत नाही. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची ईडी चौकशी हा सुद्धा त्याचाच एक भाग आहे. शिवसेना सचिव सूरज चव्हाण यांना अटक करण्यात आली, ज्या कंपनीत भ्रष्टाचार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे, त्या कंपनीचे मालक संजय म्हशीलकर हे मिंधे गटात असल्याने त्यांच्यावर मात्र कुठलीही कारवाई झाली नाही. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, आमदार रवींद्र वायकर यांच्यासह विरोधी पक्षालाच हैराण केले जात आहे. भाजपात किंवा मिंधे गटात या, नाहीतर तुम्हाला आत टाकू, अशा धमक्याच दिल्या जात आहेत. ही देशातील स्थिती आहे. एकतर्फी कारवाई पाहता पाकिस्तानातील हुकूमशाही हिंदुस्थानात आली का, असा प्रश्न पडतो, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

रोहित पवार यांच्यावरील ईडी कारवाईबाबत बोलताना शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. ईडी ही भाजपचीच विस्तारित शाखा असून भाजपविरोधात आवाज उठवणाऱयांविरोधात ईडीचा फास आवळला जातोय. रोहित पवार यांच्यामागे फक्त राष्ट्रवादी काँग्रेस नाही तर संपूर्ण महाविकास आघाडी आहे, असे ते म्हणाले. आमदार रवींद्र वायकर असतील, राजन साळवी असतील त्यांच्यामागे फक्त शिवसेना नाही तर महाविकास आघाडीची ताकद आहे, असेही ते म्हणाले.

सत्यमेव जयते…विजय सत्याचाच होणार – सुप्रिया सुळे

सध्याचा काळ आमच्यासाठी संघर्षाचा आहे, परंतु विजय सत्याचाच होणार आहे, आव्हानांवर मात करून आम्ही विजय मिळवू, असा विश्वास राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी या वेळी व्यक्त केला. रोहितने राज्यातील शेतकरी आणि कष्टकरी, सोशीतांसाठी संघर्ष यात्रा काढली. त्यामुळेच त्याच्याविरोधात सूडाचे राजकारण सुरू असल्याचे त्या म्हणाल्या.

चौकशीला पूर्ण सहकार्य करणार – रोहित पवार

ईडीने मागितलेली सर्व कागदपत्रे आपण दिलेली असून चौकशीत संपूर्ण सहकार्य करणार. महाशक्तीविरोधात सर्वसामान्यांचा आवाज उठवण्याचे काम केल्यानेच आपल्यावर ईडीकडून ही कारवाई सुरू झाल्याची लोकांची भावना आहे, चूक केली नसेल तर घाबरण्याचे कारण काय? असे रोहित पवार म्हणाले.